भुसावळ । वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार 1 ते 15 एप्रिल दरम्यान वाहन तपासणी पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यासाठी शहरात सहा पथक तैनात करण्यात आले असून या पथकाद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येऊन कारवाई केली जात आहे. त्यामुळे अवैध वाहनधारकांसह अवैध प्रवासी वाहतुक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
मद्यपी वाहनधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीवर लक्ष
काही वाहनधारक मद्यसेवन करुन वाहन चालविताता, प्रवासी वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतुक करतात. याचा परिणाम अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरु केले आहे. यासंदर्भात नाशिक विभागीय महानिरीक्षकांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार 1 ते 15 एप्रिलपर्यंत वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली पथकाची नियुक्ती
यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे एक पथक, बाजारपेठ पोलीस स्थानक – 2, शहर पोलीस स्थानक-1, तालुका पोलीस स्थानक-1, नशिराबाद पोलीस स्थानक- 1, शहर वाहतुक शाखा- 2, असे आठ पथक शहराच्या विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात 3 ते 4 पोलीस कर्मचार्यांचा समावेश असून या सर्व पथकांवर पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण राहणार आहे.
परवाने रद्द करणार
यामध्ये त्रिपल शिट, वाहनास लाईट नसणे, कागदपत्रे नसणे, मद्यसेवन करुन वाहन चालविणे आदींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतुक करताना आढळल्यास त्याला दंड आकारला तर जाईलच परंतु पुन्हा दुसर्यांदा आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस निरीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे वारंवार रहदारीत अडथळा निर्माण होत असतो. यामुळे बर्याचवेळा वाहनधारकांमध्ये वादही उद्भवत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.