शहादा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात आले. देशात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना सदृश्य रुग्ण दिवसेगणिक वाढत चालले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत असल्या तरी घरात थांबणे यावर सर्वात मोठा उपाय आहे. परंतू अनेकजण हा उपाय पाळत नसल्याने सद्या संपुर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमळे संचारबंदी शिथील होते का वाढते हे प्रश्नांकित असून पुढील उपाययोजनांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे शहरात झालेल्या पथसंचलनावरुन दिसून आले. संचारबंदीच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील तसेच वर्दळीच्या परिसरातून पोलिसांनी पथसंचलन केले. पथसंचलनाची सुरवात जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली. खेतिया रोड, गरीब नवाज कॉलनी, एकलव्य नगर, जामा मशिद परिसर, सोनार गल्ली, आझाद चौक, गांधी चौक, पिंजार गल्ली, जनता चौक मार्गे काढत पुन्हा जुन्या तहसील कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला. पथसंचलनात शहादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी , राज्य राखील पोलीस दलाची एक तुकडी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. पथसंचलनात पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सपोनी दिनेश भदाणे, निलेश वाघ, पोसई योगिता पाटील, विक्रांत कचरे , इनामदार , भगवान कोळी आदिंनी सहभाग घेतला.