अहमदनगर : जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाने नगर- नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात निळवंड आणि मुळा या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. पाणी मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाच्या निर्णयानुसार जायकवाडीसाठी ८.२२ टीएमसी पाणी धरणांमधून सोडण्यात येणार होते. या निर्णयाला अहमदनगर – नाशिक जिल्ह्यांमधून मोठा विरोध होत होता. या निर्णयाविरोधात पद्मश्री विठ्ठलराव विखे – पाटील सहकारी साखर कारखान्याने सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती.
सुप्रीम कोर्टात बुधवारी याचिकेवर सुनावणी झाली असता कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गुरुवारी सकाळी निळवंड आणि मुळा या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. निळवंड धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर मुळा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून तिथूनही सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.