जळगावातील प्रकार ; औरंगाबाद जिल्ह्यातील संशयीताला अटक, मित्र पसार
जळगाव:- पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास मनाई असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवाराने कॉडलेस ईअर फोनचचा वापर केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यास त्यास अटक करण्यात आली असून त्याच्यासह मित्राविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संशयीताचा मित्र पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी उघडकीस आली घटना
19 रोजी होणार्या लेखी परीक्षेसाठी मुख्यालयाच्या गेट क्रमांक एकवर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यासह अपर पोलीस अधीक्षकांचे रीडर तथा सहाय्यक निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, कॉन्स्टेबल विजय कचरे, अशपाक शहा हे कर्तव्यावर असतांना पहाटे 6.45 वाजता मदन महाजन डेडवाल (चेस्ट नं.273, रा.जोडवाली, पोष्ट कचनेर, ता.जि.औरंगाबाद) हा मेटल डिटेक्टरमधून प्रवेश करीत असतांना बीप आवाज झाल्याने त्याची अंगझडती घेतली असता उजव्या हाताच्या दंडावर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले. पोलीस चौकशीत संशयीताने या उपकरणात मोबाईलचे सीम कार्ड टाकल्याची कबुली देत त्यावर केवळ इनकमिंग कॉल येत असल्याची माहिती दिली. उमेदवाराच्या कानाला कॉर्डलेस ईअर फोनदेखील आढळून आल्याने तो भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली.
दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
लेखी परीक्षा साडेसात वाजता सुरू होणार असलीतरी साडेपाच वाजेपासून परीक्षार्थी परीक्षा केंद्रात येत होते. त्याचवेळी संशयीत मदन डेडवाल हा घाई-घाईत परीक्षा केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच व तपासणीपूर्वीच परीक्षा केंद्रात जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने अंगझडतीत त्याचे बिंग फुटले. या प्रकरणी त्याच्यासह त्यास परीक्षेसाठी सहकार्य करणार्या रतन प्रेमसिंग बहुरे (जोडवाडी कचनेर, ता.जि.औरंगाबाद) विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक काशिराम रत्नपारखी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.