पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १६०० जागा राखीव ठेवण्याचा विचार

0

मुंबई: काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने राज्यात मेगा पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १२५०० पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र मराठा समाजाने या पोलीस भरतीवर हरकत घेत, पोलीस भरती रद्द करण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने पोलीस भरतीचा लाभ मराठा समाजातील तरुणांना मिळणार नाही म्हणून मराठा समाजातर्फे पोलीस भरती आरक्षणाचा विषय मार्गी लागेल तोपर्यंत रद्द करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान राज्य शासनाकडून मराठा समाजासाठी आरक्षित १३ टक्के जागा अर्थात १६०० पेक्षा अधिक जागा राखीव ठेवून पोलीस भरती करण्याचा विचार करत आहेत, त्यासाठी आवश्यक कायदेविषयक बाबी पडताळून पाहत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी सरकारचा प्रयत्न आहे असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरती करु नये अशी आग्रही भूमिका घेत खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, तसेच राज्य सरकारवर टीका करत मराठा समाजात आक्रोश होईल असा इशारा दिला होता. आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असतांना भरती करण्याचा निर्णय म्हणजे मराठा समाजाला डिवचण्यासारखे आहे अशी टीका करण्यात आली आहे.