पोलीस महासंचालकांकडून धुळे पोलिसांची कानउघाडणी

0

धुळे । राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह हे गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्हा पोलीस दलाच्या निरीक्षण व चाचणीसाठी दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला पाहिजे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यावर प्रतिबंध घातले पाहिजेत. जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडतांना नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वास निर्माण झाला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून काम झाले पाहिजे अशी अपेक्षाव्यक्त करून संशयित आरोंपीविरुध्द पुरावे कसे गोळा करावे, याविषयीही मार्गदर्शन केले. यासह अनेक महत्वाच्या सूचना सिंह यांनी क्राईम मिटींगमध्ये पोलिसांना केल्यात.

मुख्यालयातील विविध विभागांना महासंचालक राजेंद्रसिंह यांनी दिली भेट
पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर ’परेड’ झाली. यावेळी अप्पर संचालक राजेंद्र सिंह यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सिंह यांनी स्वतः मैदानावर जाऊन काही त्रुटी लक्षात आणून देतांनाच अधिकार्‍यांना ’परेड’मधील बारकावे समजावून सांगितले. यानंतर त्यांच्या समोर कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यांनी मुख्यालयातील शस्त्रसाठ्याची तपासणी केली. तसेच मोटार वाहन विभागातही पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांचा दरबार घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेत मोलाच मार्गदर्शन केले.यानंतर शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालतील विविध विभागात तपासणी केली. विशेष शाखा, पत्रव्यवहार शाखा, अस्थापना शाखा, अकाऊंट शाखा यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही तपासणी केली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात सिंह यांनी अनेकांची चांगलीच खरडपट्टीही काढल्याचे आणि क्राईम मिटींगमध्येही अधिकार्‍यांना धारेवर धरले. यावेळी पोलीस अधीक्षक चैतन्या एस., अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक हिंमत जाधव, निलेश सोनवणे, रफीक शेख, देवीदास गवळी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज साक्री व शिरपूर उपविभागाची तपासणी करण्यात येणार आहे.