अनिकेत कोथळे यांची पोलीस कोठडीत हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे सांगली पोलिसांनी केलेले कुकृत्य अंगावर शहारे आणणारे आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असणार्या या यंत्रणेची काळी कृत्ये वाचून ‘ही यंत्रणा म्हणजे जनतेची छळवणूक आणि पिळवणूक करणारी टोळीच आहे’, असे खेदाने म्हणावे लागेल. कोथळे हत्या प्रकरणात तर पोलिसांनी ज्या प्रकारे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, ते वाचून चित्रपटांतील खलनायकांची आठवण येते. या कृत्यामुळे पोलीसयंत्रणेच्या भाळी लागलेला कलंक न पुसणारा आहे. हे कुकृत्य करणार्या पोलिसांचा म्होरक्या आहे पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे. कोथळे यांनी चोरी केल्या प्रकरणी म्हणे त्यांना अटक करण्यात आली. बरे, किती रुपयांची चोरी केली? तर 2 हजार रुपयांची चोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. कोथळे यांनी या चोरीची कबुली देण्यासाठी त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्यांना उलटे टांगून मारहाण करण्यात आली. दोरी सुटल्यामुळे कोथळे डोक्यावर पडले. त्या वेळी रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. कोथळे जिथे नोकरी करत होते, तो मालक अश्लील ध्वनीफिती (सीडी) बनवण्याचा धंदा करत होता. ही काळी कृत्ये कोथळे बाहेर आणील; म्हणून त्यांना ‘ठिकाणावर’ आणण्यासाठी या मालकाने कामटे यांना सुपारी दिल्याचेही बोलले जात आहे. याविषयी सत्य समोर येईलच. धर्मांध, जिहादी, राजकीय पाठींबा असणारे गुन्हेगार यांच्यासमोर शेपूट घालणारे पोलीस लेच्यापेच्यांवर मर्दुमकी गाजवतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे कामटे यांच्यासारख्या गुन्हेगारी मनोवृत्तीच्या पोलीस अधिकार्यावर वेळीच कारवाई झाली असती, तर कोथळे यांचा जीव वाचला असता.
कामटे यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्याची कबुली पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. एवढेच काय शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही कामटे यांच्या विरोधात अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारींचे पुढे काय झाले? लोकप्रतिनिधींच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणारे पोलीस सामान्य जनतेच्या तक्रारींचे काय करत असतील, याचा विचारही न केलेला बरा! एका पोलीस अधिकार्याविषयी एवढ्या तक्रारी आल्या असतांनाही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना काहीच करावेसे का वाटत नाही? सांगली पोलिसांच्या काळ्या कृत्यांची यादी मोठी आहे. वारणा येथील 9 कोटी रुपयांवर सांगली पोलिसांनी डल्ला मारल्याचे पुढे आले होते. या प्रकरणी काही पोलीस कारागृहाची हवा खात आहेत. एवढेच काय सांगलीतील पोलिसांनी धाराशिव येथे जाऊन एका महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरणही पुढे आले होते. वास्तविक पोलीसयंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणात सडली असतांना अधीक्षकांनी, तसेच पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःहून धोरणात्मक पावले उचलून यंत्रणेत सुसूत्रता आणणे अपेक्षित होते; मात्र तसे काही झाले नाहीच. उलट येणार्या तक्रारींचीही नोंद घेण्यात आली नाही. पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी ‘खाकी वर्दीतील मित्र’ यांसारख्या योजना राबवल्या जातात. या योजना किती फोल आहेत, हे पोलिसांच्या या कृत्यांवरून दिसून येते. यंत्रणेतील एखादा पोलीस काही कुकृत्य करत असेल, तर ‘ते सहकारी पोलीस अथवा वरिष्ठ यांना ज्ञात नसेल’, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पोलीस ठाण्यात एका आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याचा मुद्दा इतर पोलिसांना माहीत नव्हता का? ‘ही माहिती वरिष्ठांपासून लपवून ठेवण्यात आली’, असे म्हणणेही हास्यास्पद ठरेल. केवळ याच प्रकरणात नाही, तर गुन्हेगार पोलिसांचा त्यांच्या सहकार्यांकडून बचाव केला जातो. कोथळे यांच्या प्रकरणात तर लोकांनी 23 तास पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केल्यावर पोलिसांना जाग आली. अन्यथा कोथळे यांना ‘फरार’ घोषित करून पोलिसांनी स्वतःची कातडी वाचवली असती.
पोलीस ‘जनतेचे रक्षक आहेत’, हे बिरूदही किती पोकळ आहे, हे या प्रकरणात दिसून आले. लोक पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत असतांना एकाही पोलीस अधिकार्याने समोर येऊन जनतेला आश्वस्त केले नाही. उलट ‘आरोपी फरार आहे’, असेच उत्तर पोलीस अधिकार्यांकडून शेवटपर्यंत देण्यात आले. पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची कोथळे यांच्या नातेवाइकांनी भेट घेतली असता त्यांचेही समाधान करण्यास डॉ. काळे यांना यश आले नाही. यावरून कोठेतरी ‘पोलीसदल युवराज कामटे आणि त्यांचे सहकारी यांना पाठीशी घालत आहे’, असे स्पष्ट होत गेले. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद तर होतीच शिवाय त्यामुळे लोकांची पोलिसांवरील विश्वासार्हताही अल्प झाली.
मागील काही दिवस वर्तमानपत्रे चाळली असता, भारतभरातील पोलिसांनी केलेल्या गुन्हेगारी कृत्यांची जंत्रीच आपल्या समोर येईल. या घटनांनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. अशी सडकी, जनताद्रोही, गुन्हेगारी वृत्तीची यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पात्र आहे का ? याचे उत्तर ‘नाही’, असे असल्यास या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी शासनकर्त्यांनी काय पावले उचलली आहेत? ‘यंत्रणेतील एखाद-दुसर्यावर कारवाई करून ती सुधारील’, अशी अपेक्षाच नको.