लोणावळा ग्रामीण पोलीसांनी राबविला उपक्रम
लोणावळा : पोलीस रायझिंग डे निमित्त लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने भाजे मळवली येथील श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी पोलिसांना न घाबरता त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. तसेच पोलिसांची शस्त्रास्त्रे जवळून अनुभवता आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हे देखील वाचा
निरीक्षक रामदास इंगवले यांचे मार्गदर्शन
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास इंगवले यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस दलाच्या स्थापनेचा इतिहास सांगून भविष्यात पोलीस दलात असलेल्या नोकरीच्या संधी याविषयी त्यांनी माहिती दिली. सोबत काही शस्त्रांची देखील ओळख करुन देण्यात आली. प्रत्यक्ष शस्त्र जवळून पहाण्याचा व शस्त्र हाताळण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार गुलाब नाणेकर, पोलीस नाईक संतोष शेळके व अमित ठोसर, पोलीस काँन्स्टेबल गणेश होळकर, शिक्षक गहिनीनाथ बारगजे व कविता गायकवाड कार्यक्रमास उपस्थित होते. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत ही भावना जेव्हा सर्वसामान्यांमध्ये रुजेल तेव्हाच हे अभियान यशस्वी होईल, असे मत प्राचार्या कल्पना साळुंके यांनी व्यक्त केले. विद्यालयाचे शिक्षक संतोष तळपे यांनी सर्वांचे स्वागत केले तर पर्यवेक्षक रामदास दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.