पोलीस व साक्षीदारांना मॅनेज करून निकाल बदलला

0

धुळे । धुळ्यात चार तरुणांचे मुडदे पाडण्यात आले. त्याप्रकरणात न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडले हे जरी खरे असले तरी त्यांना निर्दोष सोडण्यासाठी कोणी खटपट केली हे धुळेकर जनतेला चांगलेच माहित आहे. चारही खून प्रकरणात आरोपी निर्दोष सुटतात हा योगा-योग फक्त माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या बाबतीत का होतो? विशेष म्हणजे मनपा जळीत कांडातील आरोपी गुड्ड्याची न्यायालयासमोर ‘परेड’ होणार होती आणि अचानक गुड्ड्याचा मर्डर झाला अशी चर्चा आहे. हा योगायोग कसा झाला? अशा प्रश्नांची सरबत्ती करत लोकसंग्रामने आज माजी आ.कदमबांडे यांच्या भोवती संशयाचे जाळे
विणले.

न्यायालयीन पुरावा नष्ट करण्यासाठीच खून
लोकसंग्रामने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, न्यायालयाचा निकाल हा न्यायालयासमोर जो पुरावा येतो त्या साक्षी पुराव्यांवर अवलंबुन असतो. न्यायालसमोर पुरावा देण्याचे काम पोलिसांचे असते. पोलिसांना आणि साक्षीदारांना मॅनेज करुन केसचा निकाल योग्य तो लावण्यासाठी तुम्ही काय खटपट केली हे तुमचेच सहकारी कैलास हजारेंना विचारा. चारही खून खटल्यातील आरोपी तुमच्या संपर्कात आल्यावर निर्दोष सुटले हा निव्वळ योगायोग होवू शकत नाही. तुमचे इतर पदाधिकारी आणि नगरसेवकांचे धंदे बघता जीवंतपणीच मृत ठरविणार्‍या ‘मोराला’ तुम्ही नगरसेवक आणि शहराध्यक्ष पद दिले. आजपर्यंत तुम्ही केलेले महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, तुमचे इतर नगरसेवक, पक्षातील पदाधिकारी बघता तुम्ही आजपर्यंत कोणाला ‘प्रतिष्ठा’ देत आले आहात हे आम्ही सांगण्याची गरज नाही. गुड्ड्या चोराला मा.आ.कदमबांडे यांनी नगरसेवक करून प्रतिष्ठा देण्याच्या तयारीत होते असे म्हटले आहे. प्रकरणांमध्ये कुठे ना कुठे राजवर्धन कदमबांडे, तुमचा संबंध येतोच कसा ? एवढा विलक्षण योगायोग तुमच्याच वाटयाला का येतो? असे पत्रक तेजस गोटे, दिलीप सांळुखे, अमोल सुर्यवंशी, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील, संजय बगदे आदींनी काढले आहे.