पुणे : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या 416 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना रविवारी सकाळी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात श्रद्धांजली वाहण्यात आली. यात महाराष्ट्रातील पोलीस हवालदार सुनिल दत्तात्रय कदम, सुरेश दत्तात्रय गावडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश श्रद्धाराव मडवी यांचा समावेश आहे.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, निवृत्त पोलीस अधिकारी व्ही. जी. वैद्य, के. के. कश्यप, प. सु. नारायण स्वामी, अजित पारसनीस, सुधाकर आंबेडकर, अशोक धिवरे, वसंत कारेगांवकर, ए. डी. जोग, सुरेश खोपडे तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
1 सप्टेंबर 2017 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत कर्तव्य बजावत असताना देशात पोलीस अधिकारी व जवान अशा 416 जणांना वीरमरण आले. त्या सर्वांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कवायतीचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे आणि पोलीस निरीक्षक सदाशिव तांबडे यांनी केले. जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीच्यादरम्यान सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, जयश्री गायकवाड यांनी केले.
देशभर पाळला जातो पोलीस हुतात्मा दिन
लडाख भागातील सरहद्दीवर 18 हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. 21 ऑक्टोंबर 1959 रोजी या ठिकाणी गस्त चालू असताना पर्वताच्या डाव्या बाजूला तुकडीला काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या दिशेने चालू लागली. तेव्हा त्यांच्यावर अचानक भयानक गोळीबार सुरू झाला. त्यात 10 जवानांना वीर मरण आले. 9 जण जखमी झाले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला होता. 13 नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हॉट स्प्रिंग्ज येथे त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पाटणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धांच्या वेळी सर्वांनी वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी 21 ऑक्टोंबरला पोलीस हुतात्मा दिन पाळून करू, अशी शपथ घेतली. तेव्हापासून दरवर्षी संपूर्ण देशभर जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो.