पोलीस हप्ते घेण्यात दंग; नगरसेवकांचा हल्लाबोल

0
शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे : मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
सर्वसाधारण सभेत निषेध; पोलीस आयुक्तांना महापालिकेत पाचारण करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुणी सर्वच असुरक्षित आहेत. सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल चोरी, भुरट्या चोर्‍यांचा कहर झाला आहे. पोलीस ठणे, चौक्या हप्ते वसुलीचे ठिकाणे झाली आहेत. पोलिसांचा उतमात वाढला असून तक्रारकर्ते, पीडितांनाही दाद देत नाही त्यांच्यावरच कायद्याचा दंडुका उगारला जातो, अशा संतप्त शब्दात सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेकानी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी टीकेची झोड उठवली.
खून, बलात्कार, विनयभंग
पिंपरीतून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय धनश्री गोपाळ पुणेकर या मुलीचा गुरुवारी एच. ए मैदानावर मृतदेह सापडला. या घटनेचे पडसाद महापालिका सभेत उमटले. भाजपच्या सीमा सावळे यांनी या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच हिंजवडी, कासारसाई येथील ऊस तोड कामगाराच्या 12 वर्षीय मुलीचा सामूहिक बलात्कारानंतर झालेला मृत्यू, विनयभंग प्रकरणात पीडित तरुणीची फिर्याद दाखल करून घेण्यास हिंजवडी पोलिसांनी केलेली टाळाटाळ या घटनांचा परामर्श घेतला. त्या अल्पवयीन मुलींना श्रद्धांजली वाहण्याची तहकूब सूचना त्यांनी मांडली. त्याला आशा शेंडगे यांनी अनुमोदन दिले.
आयुक्तालय कशासाठी आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला कदम म्हणाल्या, शहरातील मुली, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. बंदिस्त इमारतीतून दुचाकी, चारचाकी वाहने चोरीला जात आहेत. वाहनांची दिवसाढवळ्या तोडफोड केली जात आहे. विवाहितांचे मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाविद्यालया बाहेर उभ्या राहणार्‍या टोळक्याकडून विद्यार्थीनीची छेड काढली जाते. सीसीटीव्ही फुटेज देऊनही आरोपींना गजाआड करण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. घटनास्थळी जाण्यासाठी वाहने नाहीत, अशी दुरुत्तरे त्यांच्याकडून दिली जातात. ऑटो क्लस्टर इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात पोलीस आयुक्तालय सुरू केले. ही इमारत त्या हेतूने उभी केलेली नाही. महापालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी इमारती दिल्या. फर्निचरसाठी करोडो रुपये दिले. तरीही कायदा सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.
तक्रार पेट्या ठेवाव्यात
शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, भाजप आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्यास मदत करू असे विधान दहीहंडी उत्सवात केले. तेव्हापासून राज्यातील महिलांना असुरक्षित वाटत आहे. गेल्या महिन्याभरापासून पिंपरी-चिंचवडमधील महिला, विद्यार्थीनींवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. महापालिकेने महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. पोस्को कायद्याची माहिती देण्यात यावी. महापालिकेने सर्व शाळांसह पालिका इमारतींमध्ये महिलांसाठी तक्रार पेटी ठेवावी. प्रत्येक प्रभागात महिला पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक करावी.
पोलिसांचा कानाडोळा
राष्ट्रवादीचे राजू बनसोडे म्हणाले, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नाही. शहरात अवैध धंद्याला उत आला असून त्याकडे पोलीस जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. भाऊसाहेब भोईर म्हणाले, पोलिसांनी त्यांची विश्‍वासहर्ता गमावली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात हप्ते सुरू आहेत. केवळ पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नागरिक तक्रार घेऊन गेले की गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी परस्पर मिटवून घेण्याचा सल्ला देतात. शहरात सर्व आलबेल असल्याचे चित्र रंगविले जाते. पोलीस आयुक्तांसोबत पत्रव्यवहार करून त्यांना पालिकेत पाचारण करा. सर्वपक्षीय नगरसेवकांना बोलवा. त्यांच्या भावना पोलिसांपर्यंत पोहोचवा.
आयुक्तांसह नगरसेविकांची बैठक घेणार
चर्चेअंती महापौर राहुल जाधव म्हणाले, महिला, तरुणींना शहरात सुरक्षित वातावरणात फिरता आले पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच पोलीस आयुक्त, गटनेते, ज्येष्ठ नगरसेविका यांची बैठक घेण्यात येईल. यानंतर सभा कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.