यवतमाळ : पोळ्याचा सण सगळीकडे साजरा होत असतानाच यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विजय विश्वनाथ पारधी (52) असे या शेतकऱ्याचे नाव असून मनपूर येथे ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
विजय यांना पाच एकर शेती आहे. त्यांच्यावर बँकेचे 80 हजार रूपयांचे कर्ज आहे. त्यांना चार मुली असून दोन मुलींचा विवाह झाला आहे. तर अन्य दोन मुली शिक्षण घेत आहे. मागील वर्षीच्या गुलाबी बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे पैसे बँकेत आले. या पैशासाठी ते गेल्या आठ दिवसांपासून बँकेत चकरा मारत होते. मात्र पोळ्याचा सण येवूनही बोंडअळीच्या मदतीची रक्कम हाती न पडल्याने ते निराश झाले. अखेर त्यातच ऐन पोळ्याच्या दिवशी त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.