पोषण आहाराचे काम काढून घेऊ नये

0

बचतगटांची महापालिका पदाधिकार्‍यांकडे मागणी

पुणे : महापालिका शाळांमधील मुलांसाठीचे शालेय पोषण आहाराचे काम काढून घेऊ नये, अशी मागणी बचतगटांनी महापालिका पदाधिकार्‍याकडे केली आहे. पालिका शाळांमधील 25 हजार मुलांना सीएसआर योजनेंतर्गत पोषण आहार दिला जातो. याचे काम अक्षयपात्र या संस्थेस देण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून, हडपसर, वानवडी, कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या शाळांमध्ये ही योजना राबविली जाणार असून त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून करण्यात येणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून बचतगट शाळांना आहार पुरवीत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने पालिकेत नागरीवस्ती विभाग कार्यरत झाला असून त्यांतर्गत महिला बचत गट स्थापन झाले होते. बचत गटांमध्ये गोरगरीब व गरजू महिला एकत्रपणे काम करून सक्षम होण्याचा प्रयत्न करत असतात. पालिकेकडून शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते. मात्र, आता या निर्णयामुळे बचत गटात काम करणार्‍या महिलांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.