पोषण आहाराचे फोटो पाठवावे लागणार

0

जळगाव। जिल्ह्याभरातील शाळांमध्ये समावेश असलेला शालेय पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा पुरविला जातो अशी तक्रार नेहमीचीच असते. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग आता प्रत्येक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी शिजविण्यात आलेल्या पोषण आहाराचा फोटो मागविण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधी सुचना शाळांना देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार आता प्रत्येक शाळांना आहार फलकासह आहारात समाविष्ठ पदार्थाचा फोटो काढून व्हॉट्सअप किवां ईमेलच्या माध्यमातून पाठवावा लागणार आहे. तसेच आठवड्याभरात विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आहाराविषयी फलक तयार करण्यात येणार असून नियोजीत आहार विद्यार्थ्यांना पुरविला जाणार आहे. शुक्रवारी 4 रोजी जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली होती याप्रसंगी हा निर्णय झाला. बैठकीत शिक्षण विभागाशी संबंधीत योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती पोपट भाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

अनधिकृत शाळा सर्वे करा
जिल्ह्यात अनधिकृतरित्या शाळा सुरु असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावरुन सभापतींनी शिक्षण विभागाला जिल्ह्याभरात सुरु असलेल्या अनधिकृत शाळांचे सर्वे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसेच अहवालामध्ये अनधिकृत शाळा आढळून आल्यास त्या शाळा बंद करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याभरातील शाळा दुरुस्ती करण्याचे व नादुरुस्त असलेल्या शाळांच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

खरेदीचे बिल दिले नाही
विद्यार्थी व आई यांचे संयुक्त खाते उघडून त्यात दोन गणवेशाचे चारशे रुपये रक्कम टाकण्यात येणार आहे. यावल तालुक्यात तीन हजार विद्यार्थ्यांचे खाते उघडले आहे मात्र रक्कम केवळ एक हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचा मुद्दा समिती सदस्य रविंद्र सुर्यभान पाटील यांनी मांडला. तसेच शालेय व्यवस्थापन समितीमार्फत शालेय स्तरावरुन पोषण आहार धान्यादींची खरेदी करण्याचे आदेश दिले असतांना यावल तालुक्यात मात्र महिला बचत गटांमार्फत धान्य खरेदी करण्यात येत असल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला.

अधिकार्‍यांची कानउघाडणी
शिक्षण समितीच्या मासिक बैठक असतांना अधिकारी शिक्षण विभागाशी संबंधीत विषयाची तयारी करुन येत नसल्याचे सभेत दिसून आले. बोदवड येथील गटशिक्षणाधिकारी यांना गणेवश तसेच शालेय पोषण आहारा विषयी माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले यावर सभापती भोळे यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी करत जबाबदार अधिकार्‍यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळणे चुकीचे असल्याचे सांगितले.

7 शिक्षक आणि 23 विद्यार्थी
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी अचानक भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पटावर 46 विद्यार्थी तर प्रत्यक्ष 23 विद्यार्थी हजर दिसून आले. मात्र या शाळेत 7 शिक्षकांची नियुक्त करण्यात आलेली आहे. याबाबत चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी शिक्षण समितीच्या सभेत केली. तसेच काजीपुरा येथे देखील अशीच परिस्थिती असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.