पोषण आहाराच्या मालासाठी बाजारभावापेक्षा चढे दर?

0

पुरवठादारांना मुदतवाढ दिल्यानंतर आता दरांची चर्चा

जळगाव-पोषण आहार मालाच्या पुरवठादारांना मुदतवाढ दिल्यानंतर जळगावातील पुरवठादाराला धान्यादी मालासाठी देण्यात आलेले दर व काही वस्तूंच्या मुळ बाजारभावात तफावत येत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, 30 नोव्हेंबरला पुरवठादारांची मुदत संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ न देण्याचे आदेश लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार रद्द करून जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार या दरांनाही मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. 30 नोव्हेंबर 2017 ला केलेल्या करारनाम्यानुसार मूग डाळ 91 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे मान्य करण्यात आली होती. प्रत्यक्षात या डाळीचा बाजारभाव हा 77-78 रूपये प्रतिकिलो असल्याची माहिती मिळाली आहे. डाळीप्रमाणेच अनेक वस्तूंच्या दरांमध्ये मोठी तफावत आढळत असल्याने यासंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकप्रतिनिधींची मागणीनंतर मुदतवाढ
शालेय पोषण आहाराचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर पोषण आहारासाठी तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करणार्‍या पुरवठादारांना मुदतवाढ न देता स्थानिक स्तरावर धान्यादी मालाची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दरम्यान, पुरवठा करण्याची मुदत 30 नोव्हेंबरला संपुष्टात आली होती. धान्यादी माल अन्न शिजविणार्‍या यंत्रणेणेच खरेदी करून अखंडितपणे योजना सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी मुंबई व अहमदनगर वगळता सर्वच जि.प.च्या प्राथमिक शिक्षकांना दिले होते. पुरवठादारामार्फत या मालाचा पुरवठा करण्याची प्रचलित पध्दत सुरू ठेवण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली असल्याने शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी 15 डिसेंबर रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

पुरवठादारांना देण्यात येत असलेले दर (प्रति किलो रूपये)
मूग डाळ- 91, मसूर डाळ-82, तूर डाळ-80, हरभरा- 76, चवळी 68, मटकी-86, मूग-83, वाटाणा-57, तेल प्रतिलिटर-100, कांदा लसूण मसाला-189, जिरे- 238, मिरची पावडर-189, गरम मसाला-189, तांदूळ वाहतूक खर्च प्रति किलो 1.20 रूपये,

मिळालेल्या माहितीनुसार बाजार भाव (प्रति किलो, रूपये)
मूग डाळ 70-78, मसूर डाळ 51-52, तूर डाळ 68-70, हरभरा 58-60, तेल- सोयाबीन 80, चवळी 41-42, मटकी 50-51, वाटाणा- 68