पोषण आहारात पावडर टाकण्याचा प्रयत्न

0

पोलादपूर । तालुक्यातील रानवडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शालेय पोषण आहारात अज्ञात व्यक्तीने ओलसर पावडर टाकून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गावपातळीवर विषय मिटवण्याच्या प्रयत्न पोलादपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रत्यक्षभेटीनंतर दिसून आला आहे. यासंदर्भात, पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक सुभाष कुरणे यांनीही दुसर्‍याच दिवशी भेट देऊन गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांना लेखी अहवाल सादर केला असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अभिप्रायही दिला आहे.

रानवडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यामध्ये तसेच खिडकीतून रिकाम्या वर्ग खोलीमध्ये पांढर्‍या रंगाची पावडर टाकल्याचे गुरुवार 9 नोव्हेंबर रोजी समजून आले होते. यामुळे 10 नोव्हेंबर रोजी स्वयंपाकी मदतनीस विजया वारे यांनी सदरचा वर्ग अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीने धुतल्याने सदर पावडर कोणत्या प्रकारची आहे, याबाबत नमूने प्राप्त होऊ शकले नाहीत व खुलासा होऊ शकला नाही.या वर्गखोलीमध्ये शालेय पोषण आहाराचे अन्न शिजवून व्हरांड्यामध्ये विद्यार्थ्यांना जेवण दिले जात असल्याने या दोन्ही ठिकाणी पावडर टाकण्याची कृती संशयास्पद असल्याचे दिसून आल्याने शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन कमिटी, सरपंच, पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आणून देत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांना कळविले.