पोषण आहारापासून विद्यार्थी वंचीत

0

जळगाव। जिल्ह्यातील शाळांना पुरविण्यात येणार्‍या शालेय पोषण आहारातील घोळ अद्यापही संपलेला नसल्याचे चित्र आहे.ठेकेदाराला मुदतवाढ देण्यावरुन वाद सुरु असतांनाच निकृष्ट पोषण आहार प्रकरण उघड झाले. हा प्रश्‍न राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात देखील गाजला. त्यानंतर शासनाने ठेकेदारी रद्द करुन थेट शालेय स्तरावरुन पोषण आहार खरेदीचे आदेश दिले. मात्र किराणा साहित्य वगळता तांदुळ पुरवठा हा ठेकेदारांमार्फतच होईल असे सांगितले. दरम्यान शालेय पोषण आहारातील नवीन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरवठादाराकडून शाळांना धान्य पुरवठा करण्यास विलंब झाल्याने तांदुळ शिल्लक नसल्याने पोषण आहार शिजविला गेला नसल्याचे समोर आले आहे. जामनेर तालुक्यातील लिहे तांडा येथे आठवड्याभरापासून तांदुळ पुरवठा करण्यात आलेला नसल्याने शालेय पोषण आहार बंद ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

अधिकार्‍यांनी केली चौकशी : लिहे तांडा येथे तांदुळ नसल्याने पोषण आहार बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनात आल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जामनेर पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशान्वये अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधत विचारपूस केली.

ठेकेदाराचा मनमानी कारभार : तांदुळ संपल्यानंतरही ठेकेदाराकडून नव्याने पुरवठा केला जात नाही. वास्तविक ठेकेदाराला साठा शिल्लक ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेले आहे. मात्र ठेकेदारा आदेशाला जुमानत नसून मनमानी कारभार करीत आहे. साठा शिल्लक नसतांनाही ठेकेदारामार्फत उशीरा पुरवठा होत आहे. लिहे तांड्यासह इतरही ठिकाणी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या देणगीतुन भागविले
गेल्या आठवड्याभरापासुन ठेकेदाराकडून तांदुळ पुरवठा होत नसल्याने शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांकडून देणगी स्वरुपात तांदुळ गोळा करुन मुलांना पोषण आहार पुरविला गेला. ठेकेदाराकडून विलंब होत असल्यास शाळांनी आपल्या स्तरावर तांदुळ खरेदी करावयाचे आदेश असतांना देणगी स्वरुपात तांदुळ गोळा करण्याची आवश्यकता काय? असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना भ्रमणध्वनीवरुन सांगितले. तसेच पुरवठा होत नसल्यास वरिष्ठांना कळवण्याच्या सुचनाही केल्या.

शासनाच्या आदेशान्वये तांदुळ वगळता इतर वस्तुंची खरेदी शालेय स्तरावरुन करावयाचे आहे. तांदुळ पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला तांदुळाचा शिल्लक साठा ठेवण्याच्या सुचना करण्यात आलेल्या आहेत. मात्र ठेकेदारांकडून शिल्लक साठा ठेवला जात नसल्याने प्रसंगी आहार शिजविला जात नसल्याची तक्रार असल्याने शाळेला भेट देऊन चौकशी करु दोषी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करु.
पोपट भोळे, शिक्षण सभापती

ठेकेदाराकडून तांदुळ पुरवठा वेळेवर न झाल्यास मुख्याध्यापकाने व्यवस्थापन समितीच्या परवानगीने शालेय स्तरावरुन तांदुळ खरेदी करावा. तांदुळ शिल्लक नसल्याने आहार बंद ठेवू नये अशा सुचना वेळोवेळी बैठका घेऊन दिलेल्या आहेत. ठेकेदाराकडून तांदुळ पुरवठा करण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचीत असल्याची तक्रार आल्यानंतर जामनेर गटशिक्षणाधिकारी यांना सुचना देऊन संबंधीत शाळांना भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
भास्कर पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी