पोषण आहार अधिक्षकांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
( वरणगांव महात्मा गांधी विद्यालयातील पोषण आहार प्रकरण येणार अधिक्षकांच्या अंगलट )
प्रतिनिधी : वरणगांव
वरणगांवच्या महात्मा गांधी विद्यालयातील शालेय पोषण आहाराची अधिक्षकांनी तपासणी केली. मात्र, या तपासणीत अनेक त्रुटी असून अधिक्षक तडवी यांचेद्वारे एक प्रकारे पोषण आहारात घोळ निर्माण करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे . यामुळे पोषण आहार प्रकरण अधिक्षक अजित तडवी यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही .
वरणगांव येथील नावाजलेल्या महात्मा गांधी विद्यालयातील शालेय पोषण आहाराचा पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधिक्षक अजित तडवी, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे व शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी दि २९ ऑगष्ट रोजी पंचनामा केला. मात्र, अधिक्षक अजित तडवी, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी जाणीवपूर्वक पोषण आहाराचा गैरप्रकार व धान्य साठ्यातील तफावत दडपण्याचा प्रयत्न केला असुन यामध्ये विद्यालयाचे निलंबीत मुख्याध्यापिका यांच्या स्वाक्षरीने पंचनामा करून नियमांचे उल्लघंन केले आहे . तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी केले असले बाबतच्या प्रमाण पत्राची पडताळणी केली नाही . धान्यसाठ्याच्या तपासणीवेळी नोंदवहीतील दैनंदिन नोंदी व विद्यार्थी पटसंख्या – उपस्थिती पंचनाम्यात नमुद करणे आवश्यक असतांना ते मुद्दाम टाळण्यात आले . तसेच एक महीन्याचा ४० क्विंटल साठा अपेक्षित असतांना १ .५० क्विंटल किडग्रस्त धान्य साठ्या व्यतीरीक्त जादा प्रमाणात आढळुन आलेला ६० क्विंटल तांदुळाची पंचनाम्यात नोंद करण्यात आली नाही. तर पोषण आहाराच्या नोंदवहीत व्हाईटनरचा वापर करून त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले . याबाबत तक्रारदारांनी आक्षेप घेतला असता त्यांची पंचनाम्यात नोंद करण्यात आली नसल्याने शालेय पोषण आहार अधिक्षकांनी केलेला पंचनामा हा प्रकरण दडपण्याचा प्रकार असुन शालेय समिती अध्यक्ष गणेश झोपे व संस्थेचे सचिव डॉ . गोविंद हरी चौधरी यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे . यामुळे शालेय पोषण आहाराचे प्रकरण अधिक्षक अजित तडवी यांच्या चांगल्याच प्रकारे अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही .
*अधिक्षकांचा अजब फतवा ?*
शालेय पोषण आहार अधिक्षक अजित तडवी यांनी दि. २९ /८ / २०२३ रोजी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राप्त झालेला साठा व शाळेत उपलब्ध असलेला साठा यांचे व्हिडीओ किंवा फोटो कुणालाही काढू द्यायचे नाहीत असा अजब फतवा काढला असल्याची चर्चा चांगलीच रंगु लागली आहे .