पुरवठादारावर गुन्हा दाखल करा; पल्लवी सावकारेंची मागणी
जळगाव:शालेय पोषण आहार पुरवठादाराकडून शहरातील एका शाळेत धान्यादी पुरवठा करताना ५० किलोच्या गोण्यात प्रत्यक्ष ३५-४० किलोच तांदूळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकारची जळगाव गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. चौकशी अहवालात पुरवठादार दोषी आढळून आल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने खुलासा सादर करण्याचे पत्र देण्यात आले आहे. ७ जानेवारीपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश होते, मात्र अद्यापही खुलासा सादर न झाल्याने सीईओंच्या आदेशाला पुरवठादाराकडून ठेंगा दाखविल्याचे उघड झाले आहे. यावरून प्रशासनाच्या आदेशाची अहवेलना होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे संबंधित पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र सावकारे यांनी सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांना दिले आहे.
अधिकाऱ्यांवरही कारवाई करा
शालेय पोषण आहार गैरव्यव्हार प्रकरणी पुरवठादार गुणिना कर्मीशिअल प्रा. लि. या पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव जि.प. प्रशासनाने तयार करून शासनाकडे पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकारात काही अधिकारीही दोषी असल्याचा संशय असल्याने अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्यात येऊन कारवाई करावी अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.
शासनाकडे प्रस्ताव पाठवावे
गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल दिला. अहवालात ठेकेदारावर गैप्रकाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. अहवालावरूनच संबधित ठेकेदारास आठ दिवसात म्हणणे सादर करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. या सर्व घटना लक्षात घेता, अशा घोटाळेबाज पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन, संबधित पुरवठादारास काळ्या यादीत टाकणेबाबात शिक्षण संचालक पुणे यांना आपल्या स्तरावरून प्रस्ताव सादर करावा अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील नंदिनीबाई वामनराव विद्यालयाला पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्यादीची तपासणी केली होती. यावेळी प्रत्येक गोण्यांचे वजन हे कमी भरले होते. यासह पुरवठादाराने वजन काटाही पुरविला नव्हता, ओळखपत्र नव्हते, पाककृतीची अमंलबजावणी केली जात नाही, यासह अनेक अटी शर्थींचे उल्लंघन केले होते. जळगाव गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेत जाऊन प्रकार तपासले त्यावेळी त्यांना पुरवठादाराकडून करारनामयाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. तसेच वजनात गैरप्रकार दिसून आला.