जळगाव । जिल्ह्यातील शाळांना पुरविण्यात येणारा पोषण आहार धान्य हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे तपासणीतुन आढळून आल्यानंतर सीईओंच्या आदेशान्वये जिल्ह्याभरातील शाळांमधील पोषण आहाराची तपासणी सुरु आहे. धरणगाव जिल्ह्यातील पोषण आहार तपासणीचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. अहवालात शंभर टक्के धान्य चांगल्या प्रतिचे असून खाण्यायोग्य असल्याचे नमुद करण्यात आले आहे. मात्र धरणगाव तालुकयातील साळवा-बांभुरी गटातील जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी बुधवारी 12 रोजी तालुक्यातील आठ शाळांची तपासणी केली असता, त्यांना पोषण आहार निकृष्ट दर्जाचे खाण्यायोग्य नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन पोषण आहारात सावळागोंधळ सुरु असल्याचे दिसून येते. याबाबत त्यांनी गुरुवारी 13 रोजी धान्याचे नमुने सोबत आणत अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, शिक्षण सभापती पोपट भोळे यांच्याकडे तक्रार करुन संबंधीत पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी केली.
भेसळयुक्त धान्य
माधुरी अत्तरदे यांनी धरणगाव तालुक्यातील उखळवी, रोटवद, खुर्द, धरणगाव शहरातील दोन शाळांमध्ये पोषण आहार धान्यांची तपासणी केली असता त्यांना निकृष्ट व भेसळयुक्त धान्य असल्याचे दिसून आले आले. मिरची पावडर पाण्यात टाकून बघीतले असता त्यात विटाची भुकटी, मोहरीत लाल खडे असल्याचे आढळून आले. तसेच सोनवद रस्त्यावर पोषण आहार पुरवठा करणारी वाहन अडवुन तपासणी केली असता त्यात चांगल्या दर्जाचे धान्य आढळून आले.
कराराचा भंग
पोषण आहाराच्या करारात पोषण आहार साहित्यावर कंपनीचे नाव, आयएसओ प्रमाणीत असल्याचे चिन्ह, ऍगमार्क असणे आवश्यक आहे मात्र पोषण आहार साहित्याचे पाकिटे तपासली असता त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह अथवा कंपनीचे नाव आढळून आले नसल्याने पुरवठादारांनी कराराचा भंग केलेला आहे. पारदर्शक पिशवीतून आहारात समाविष्ट असलेल्या साहित्याचा पुरवठा होतो.
नमुने तपासणीला पाठविणार
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हजर नसल्याने अत्तरदे यांनी अतिरिक्त सीईओ म्हस्कर यांच्याकडे तक्रार केली. म्हस्कर यांनी नमुने तपासणीला पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच आम्ही स्वतःजिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन पोषण आहाराची तपासणी करु असे तक्रारदारांना सांगितले. याबाबत शिक्षण विभागाची बैठक घेऊन तपासणीला जाण्यासंबंधी सुचना करण्यात येणार आहे.
चुकीचा अहवालसाठी दबाव
सीईओंनी पोषण आहार निकृष्ट असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्ह्याभरातील 1800 शाळांमधील आणि गोदामातील पोषण आहार धान्यांदीचे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्याभरातील शाळांची तपासणी सुरु आहे. तपासणी करुन अहवाल पाठविण्याचे आदेश असल्याने धरणगाव गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणविभागाकडे गुरुवारी सकाळी अहवाल पाठविला. अत्तरदे ह्या शाळेत तपासणीसाठी गेले असता त्यांना नाव न सांगण्याच्या अटीवरुन तसा अहवाल देण्यासाठी दबाव टाकण्यात आले असल्याचे सांगितले.