जळगाव । जिल्ह्याभरातील शाळांमध्ये पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार धान्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तपासणीतुन दिसून आले आहे. भाजपाच्या भुसावळ तालुक्यातील कुर्हासीम जिल्हा परिषद गटाच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी मोढाळा, खंडाळा येथील शाळांमध्ये तपासणी केली असता त्यांना धान्य किड सदृश्य असल्याचे आढळून आले होते. त्यांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे शिक्षण विभागासह जिल्हा परिषद हादरली आहे. मागील दिवसी केलेल्या तपासणीत शाळेतील व गोदामातील धान्य साठ्यात तफावत असल्याचे दिसून आले. निकष्ट दर्जाचे पोषण आहार पुरवठा होत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याने पोषण आहार पुरवठा दारांचे नावे काळ्या यादीत टाका अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
जिल्ह्याचा विषय राज्यपातळीवर
जिल्ह्यात शालेय पोषण आहार प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शासनाचे आदेश जुगारुन जुन्याच ठेकेदाराला धान्यादी पुरवठ्याची मुदतवाढ देण्यात आल्याने जिल्ह्यातून याचा विरोध होत आहे. विरोध केला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेच पल्लवी सावकारे यांनी देखील पुरवठादाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असल्याने जिल्ह्याचा विषय हा राज्यपातळीपर्यत पाहोचला आहे. तसेच शालेय पोषण आहार प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना शालेय पोषण आहारात रस असल्याचे सांगितले जाते.
गुणवत्तेवर परिणाम भीती
मुदतवाढीच्या विषयानंतर मागवण्यात येणारी माहिती, आदेश, सूचना, पुरवठा या गोष्टीचा पुरवठा शिक्षकांनाच करावा लागत असल्याने शिक्षकांसाठी ते त्रासदायक ठरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे बहुधा दुर्लक्ष होते. याचा परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर होण्याची भित वर्तविली जात आहे. पोषण आहाराच्या ताणतणावांमुळे विद्यार्थ्यांची नियमित शिकवणी शाळा सुरु होऊन दोन आठवडे उलटल्यानंतरही सुरळीत सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
शिक्षकांची डोकेदुखी
पोषण आहाराच्या मुदतवाढीवरून वातावरण तापले असताना शिक्षक मात्र या प्रकाराने चांगलेच धास्तावले आहेत. शिक्षण संचालक, कक्ष अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी या वरिष्ठ यंत्रणेकडून वेगवेगळ्या आदेशांमुळे खालच्या पातळीवर शिक्षक अडचणीत येत असल्याने पोषण आहार शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिक्षकांमध्ये एका प्रकारची धास्ती निर्माण झाल्याने शिक्षक तणावाखाली वावरत आहे.