पिंपरी-चिंचवड : ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता सायकलवर फिरुन घरोघरी जाऊन पोस्ट कार्ड देणार्या पोस्टमन काकांच्या हातावर राखी बांधून रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या पदाधिकार्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. चिंचवड येथील पोस्ट ऑफीसमध्ये सोमवारी (दि. 7) झालेल्या या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, चिंचवड पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर एस. जी. डुंबरे, रोटरीच्या सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, रवींद्र भावे, अनिता शर्मा, सारंग माताडे, भाऊसाहेब पांगारे, अनिल शर्मा, बाळासाहेब उर्हे, राजेंद्र भोसले, सदाशिव काळे, सुवर्णा काळे, उषा उर्हे, आनंद सूर्यवंशी उपस्थित होते.
‘लिफाफा’ योजनेचे कौतूक
यावेळी बोलताना पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे म्हणाल्या, पोस्टमन आजही सायकलवर फिरून घरोघरी पोस्टकार्ड वाटतात. ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतूक करावे तेवढे कमी आहे. पोस्ट कार्यालयाने यंदा राखी विशेष ’लिफाफा’ योजना आणली. कुटुंबियांपासून दूर राहणार्या भाऊ-बहिणींना याचा खूप फायदा झाला. या योजनेमुळे रक्षाबंधनच्या दिवशीच भावापर्यंत बहिणीची राखी पोहोचली, असे पांगारे यांनी सांगितले.
पोस्ट कार्यालयाने महत्त्व टिकवले
पोस्ट मास्तर एस. जी. डुंबरे म्हणाले, जगाच्या कुठल्याही कोपर्यात इंटरनेटच्या माध्यमातून केवळ काही सेकंदात संदेश पाठविणे सोपे झाले आहे. परंतु, या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पोस्ट कार्यालयाने आपले महत्त्व कायम ठेवले आहे. याची प्रचिती यावर्षी पोस्ट कार्यालयाने सुरू केलेल्या राखी विशेष टपाल या योजनेने दिली, असे डुंबरे यांनी सांगितले.