पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

0

धुळे। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे पांझरा नदी किनारी असलेल्या गाव विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. धर्मराज शिंदे आणि कमलेश चौधरी (दोघेही 20 वर्षीय) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. मेहेरगाव गावाला पांझरा नदी वर पाणीपुरवठ्यासाठी विहीर असून या विहिरीत कुसूंबा येथील काही तरुण दुपारी पोहण्यासाठी गेले होते.

विहिरीजवळ कपडे आढळल्याने घटना उघडकीस
विहिरीजवळ तीन मुलांचे कपडे पडून होते. यावरून संशय आल्यानंतर गावातील काही लोकांनी विहिरीत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र हाती काही लागले नाही. अखेर धुळ्यातून आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलाविण्यात आले. या पथकांनी अथक प्रयत्नातून दोघा तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. बराच वेळ तिसर्‍या व्यक्तीचा शोध घेतला गेला, मात्र प्रयत्न करूनही तिसर्‍या व्यक्तीचा शोध लागला नाही. म्हणून दोघांचे मृतदेह बाहेर काढून शोधकार्य थांबविण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेकडो लोकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती.