साकळी शिवारातील सुखद घटना
साकळी– विहिरीत तोल जावून पडलेल्या पत्नीला पतीने पोहता येत नसतानाही धाडस दाखवत विहिरीत उतरून वाचवल्याची घटना साकळी शिवारात शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दाम्पत्य सुखरूप बचावले आहे. साकळीतील जरीना लतीब तडवी (25) ही विवाहिता साकळी शिवारातील देविदास पाटील यांच्या शेतातील विहिरीत तोल जावून पडल्या. ही बाब पती लतीब कासम तडवी यांनी कळताच त्यांनी पाईपाद्वारे विहिरीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने पाण्यात पडलेल्या जरीना लागलीच वर आल्याने तडवी यांनी त्यांना आपल्याकडे ओढून काही वेळ धरून ठेवले तर याचवेळी शिरसाडचे अमरसिंग छत्रीसिंग बारेला व साकळीचे बाळू छबू तडवी यांनी सहकार्य करीत उभयंतांना बाहेर काढले. उभयंतावर ग्रामीण रुग्णालयात डॉ.रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार केले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.