महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची माहिती
राज्यभरातील जमिनींचे मोजमापाच्या कामाला सुरुवात
जळगाव- गोरबंजारा समाजाचे भावी पिढीला दर्शन व्हावे, यासह इतरही समाजाला संस्कृतीचे दर्शन व्हावे, यासाठी संत सेवालाल महाराजांचे समाधीस्थळ , वाशिम जिल्ह्यात मनोरा तालुक्यात पोहरागढ येथे 450 कोटींचे भव्य वास्तुसंग्रहालय (नंगारा भवन) उभारण्यात येणार आहे. शिखर समितीने 125 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 3 डिसेंबर 2018 रोजी त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा होणार असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका होणार असून त्यासाठी मंत्री संजय राठोड हे जिल्ह्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी पद्मालय विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप केला. भूमिपूजन सोहळ्यादरम्यान समाजाचा मेळावाही होणार असून यावेळी समाजाच्या विविध संघटना समाजाच्या व्यथा, कथा तसेच विविध विषयांवर चिंतन, मंथन करणार आहेत, असेही ते म्हणाले. या सोहळ्यासाठी राज्यभरातून 4 ते 5 लाख समाजबांधव येतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. अमृतसरमधील भव्य खालसा संस्कृती या धर्तीवर संत सेवालाल महाराजांचे वास्तुसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्यासोबत परिषदेला यावेळी बंजारा समाजाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
दीडशे वर्षानंतर होणार जमिनींचे मोजमाप
जमिनीच्या वादाच्या गेल्या काही वर्षापासूनच्या अनेक तक्रारी आहेत. यासाठी तक्रारदाराला मंत्रालयात वार्या कराव्या लागत होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेवून या तक्रारी आहे त्याच जिल्ह्याच्या ठिकाणी निकाला काढण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याठिकाणी विभाग वाटून घेण्यात आले असून लवकरच त्यासाठी बैठका घेण्यात येतील, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले. तसेच 1840 मध्ये इंग्रज राजवटीत जमिनींचे मोजमाप करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा दीडशे वर्षानंतर जमिनींचे मोजमाप व्हावे यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार राज्यभरातील जमिनींचे सॅटेलाईट सर्व्हेक्षणाला तसेच मोजमापाला सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.