पोहरे गावातील आगीत सात लाखांची रोकड खाक ; 20 लाखांचे नुकसान

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील शेतकर्‍याच्या घराला गॅस गळतीमुळे आग लागल्याने सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले. नवीन घर घेण्यासाठी आणलेली रोकड आगीत जळाल्याने शेतकर्‍यावर संकट कोसळले असून रविवारी सकाळी 11 वाजता लागलेल्या आगीत घरातील सात लाख 70 हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने व साहित्य जळून खाक झाले.

शेतकर्‍यावर कोसळले संकट
पोहरे येथील शेतकरी केशव राघो माळी हे मधुकर माळी यांच्या मातीच्या घरात भाडेतत्त्वावर राहतात. केशव माळी हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह शेतात गेले होते. घर बंद असताना गॅस गळतीमुळे घराला आग लागली. बाहेर धुराचे लोट निघू लागल्यानंतर शेजार्‍यांना ही घटना समजली. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे माळी यांना आगीची माहिती कळवली. तसेच ग्रामस्थांनी दरवाजा उघडून पाण्याचा मार केला. घर मातीचे असल्याने, लाकडांनी लागलीच पेट घेतला. ग्रामस्थांच्या प्रयत्नाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळाले. चाळीसगाव पालिकेच्या बंबालाही घटनास्थळी पाचारण केले होते.