प्रकटदिनानिमित्त गजानन महाराज मंदीरात गर्दी

0

मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवी सांगवी : शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या 140 व्या प्रकटदिनानिमित्त जुनी सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. बुधवारी विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे 40 हजारहून आधिक भाविकांनी श्रीं चे दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराच्या वतीने प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले होते.

महाप्रसादाचा लाभ!
जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास न्यासाचे अध्यक्ष शरद ढोरे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थित ‘श्रीं’ महारूद्राभिषेक घालण्यात आला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी ‘श्रीं’च्या प्रकटदिनानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण झाले. यामध्ये सुमारे 800 हून आधिक भाविकांनी सहभाग घेतला. दुपारी साडेबाराला महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना पिठलं भाकरी, मिरची खर्डा व चपाती तसेच लाडू या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद बनविण्यासाठी 300 हून आधिक सेवेकरी महिलांची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादासाठी तब्बल 18 क्विंटल गव्हाचे पीठ तसेच 600 किलो बुंदीचा वापर करण्यात आला. भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रकटदिनानिमित्त मंदिराभोवती केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजाळून गेला होता. श्री गजानन महाराज सेवा न्यासातर्फे सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.