प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी विद्यावेतन सुरु ठेवा

0

नवी मुंबई । प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सिडकोने विद्यावेतन योजना सुरु केली. मात्र अलिकडेच ही योजना अचानक बंद केली. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्या, उदरनिर्वाहाचे साधन गेले. अशा परिस्थितीत त्यांना आपल्या पाल्यांना शिक्षण द्यावे लागत आहे. सिडकोची आर्थिक उलाढाल मोठया प्रमाणात असताना तुटपुंज्या रकमेसाठी ही योजनाच बंद करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांवर अन्याय असल्याचे आमदार संदीप नाईक म्हणाले. एकीकडे राज्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध योजना राबवित असताना दुसरीकडे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना देण्यात येणारे विद्यावेतन बंद करुन या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वचिंत ठेवण्याचाच हा प्रकार आहे, असे आमदार नाईक म्हणाले.

उन्नत मार्गाचे काम सुरु करा
मुंबई ते नवी मुंबई व नवी मुंबईतून मुंबईकडे जाण्यासाठी तसेच मुंब्रा, शिळफाटा, व पनवेलकडे जाण्यासाठी ऐरोली मार्गे जावे लागते. त्यामुळे ऐरोली येथे वाहनांची प्रचंड कोंडी होत असते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी या परिसरात उन्नत मार्गाची मागणी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती. त्या अनुशंगाने एमएमआरडीएने मुलुड ऐरोली ब्रीज ते ठाणे-बेलापूर रोड (भारत बिजली) असा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्नत मार्गाचे काम देखील लवकरात लवकर हाती घेण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली.