नवी मुंबई । नवी मुंबईतील जमिनीचे मालक असलेले आगरी कोळी हे आपल्या वरील शासनातर्फे झालेल्या अन्यायाविरोधात उभे ठाकले आहेत. आगरी कोळी समाजातील थोर नेत्यांनी शासनाविरोधात केलेले लढे व त्यातून सुटलेले प्रश्न समोर ठेवून आजची पिढीदेखील मैदानात उतरलेली आहे. आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून समजतील तरुण एकवटले आहेत. यातूनच राजकारणविरहित संघटना स्थापन करून सिडको प्रशासनाविरोधात लढा सुरू केलेला आहे. सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहण करून त्यावर नवी मुंबई वसवली आहे. मात्र, 49 वर्षे होऊन देखील सिडकोने प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त या नात्याने अनेक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. त्यासाठीचा निर्णायक लढा आगरी कोळी युथ फाउंडेशनने उभारला आहे. मात्र, हा लढा उभारताना शासनावर दडपण आणण्यासाठी व शासनाकडे आवाज उठवण्यासाठी राजकीय दबाव व वाचक असणे गरजेचे आहे. यासाठी आगरी कोळी युथ फाउंडेशनने माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच माजी आमदार विवेक पाटील व शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांची भेट घेतली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत गावठाण आणि विस्तारित गावठाणातील जमिनीचे सर्वेक्षण, जमिनीचे नियमितीकरण आणि बांधकामांचे नियमितीकरण या सर्व विषयांवर चर्चा झाली.
भूमिपुत्रांना नियमितीकरणात स्थान मिळावे
नवी मुंबई प्रकल्पासाठी जमीन देऊन 100% भूमिहीन होणार्या भूमिपुत्रांना नियमितीकरणामध्ये विशेष स्थान मिळणे गरजेचे आहे अशी भावना माजी खासदार ठाकूर यांनी व्यक्त केली. आगरी-कोळी युथ फाउंडेशनतर्फे उचलून धरलेल्या या विषयाला शासन दरबारी मांडून तो सोडविला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व प्रथम सर्वेक्षण करून जमिनींचा अधिकार मग तो सनद, प्रॉपर्टी कार्ड अथवा अॅॅग्रिमेंटच्या माध्यमातून मिळवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जी बांधकामे नियमित होऊ शकतील त्यांना नियमित करणे आणि जी काही तांत्रिक निकषांमुळे नियमित होऊ शकणार नाहीत त्यांना वाढीव एफ.एस.आयच्या माध्यमातून भविष्यात पुनर्विकासाचा पर्याय देऊन संरक्षित करता आले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यासंदर्भात एक प्रेझेंटेशन बनवून मुख्यमंत्री महोदयांकडे लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन रामशेठ ठाकूर यांनी युथ फाउंडेशनला दिले. तर याच विषयावर आधी सिडको स्तरावर चर्चा घडवून विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याबद्दल आणि आवश्यकता भासल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात गावठाणाच्या विषयाला पटलावर आणून नियमितीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यात येईल असे आश्वासन माजी आमदार विवेक पाटील व विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित सदस्यांना दिले. तसेच हे विविध विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी रायगड आणि नवी मुंबई मधील सर्व पक्षीय राजकीय नेतृत्वांना एका मंचावर येऊन जोर लावण्याची तयारी करावी लागेल याबाबत चर्चा केली गेली. प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी हे सर्व नेते शासनदरबारी मुद्दे मांडून सिडकोने प्रकल्पग्रग्रस्तानवर केलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवतील, असा विश्वास आगरी कोळी युथ फाउंडेशनने बोलून दाखवला.