प्रकल्पग्रस्तांसाठीच्या माहूलमधील इमारतींच्या दुरुस्तीकरिता 14 कोटी मंजूर

0

मुंबई । मुंबईमध्ये अनेक विकासकामे व प्रकल्प सुरू आहेत. या विकासकामात व प्रकल्पात बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांना चेंबूर माहुल येथे पाठवण्यात येते. माहुलमध्ये सोयी-सुविधा नसल्याने या ठिकाणी कोणीही राहण्यास तयार नसतात. या विभागात राहण्यास पाठवले म्हणजे नरकात पाठवले असे संबोधले जाते. या विभागात सोयी-सुविधा नसल्याने महापौर, विरोधी पक्ष नेते व गटनेत्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर या विभागाची परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माहुलमधील डी. बी. डेव्हलपर या विकासकाने बांधलेल्या एव्हरस्माईल संकुलातील इमारतींची दुरुस्ती व सोयीसुविधा पुरण्यासाठी पालिकेने 14 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या एम पश्‍चिम विभागाच्या हद्दीत येणार्‍या माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांना राहण्यास पाठवणे म्हणजे नरकयातना देणे अशी टीका सातत्याने प्रशासनावर होत आली आहे. माहुलच्या विकासासाठी 300 कोटी रुपये देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. माहुलचा प्रश्‍न स्थायी समिती व पालिका सभागृहात चांगलाच गाजला होता. महापौर, विरोधी पक्ष नेते, गट नेते यांनी माहुलला भेट दिली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाबरोबर बैठक घेतली. यावेळी माहूलच्या इमारती दुरुस्तीचे व सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका प्रशासनाने डी. बी. रिअ‍ॅलिटी या विकासकाने बांधलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच्या इमारतींची दुरुस्ती करण्याचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केले आहेत. त्यानुसार देव इंजिनिअर्सकडून इमारत क्रमांक 2,3,4,5,7,8,9,10,11,60,61,63 या 12 इमारतीची दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. त्यासाठी 6 कोटी 83 लाख 47 हजार 610 रुपये खर्च केला जाणार आहे.

मूलभूत सोयी-सुविधा पुरवणार
तर भव्य एन्टरप्रायझेसकडून 1,6,37,38,39,41,42,56,57,64, या 10 इमारतींची दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. त्यासाठी 7 कोटी 34 लक्ष 5 हजार 905 रुपये खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्तीच्या कामात पाणीपुरवठा, सांडपाणी, पावसाळी पाणी वाहून नेणारी पाईपलाईन बसवणे, खोल्यांमधील व संडास बाथरूममधील लाद्या बदलणे, संडास बाथरूममधील लिकेज बंद करणे, दरवाजे अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या दरवाजे दुरुस्त करणे बसवणे, सांडपाणी वाहून नेणारे पाइप चेंबर व लाइनची दुरुस्ती केली जाणार आहे.

प्रस्तावावरून होणार खडाजंगी
दरम्यान माहूलमधील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी पालिका 14 कोटी रुपये खर्च करणार असली तरी त्यासाठी दोन वेगवेगळे प्रस्ताव आणले आहेत. दोन कंत्राटदारांना दुरुस्तीची कामे वाटून देण्यात आली आहेत. त्यासाठी दोन वेगवेगळे प्रस्ताव सादर का करण्यात आले असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच माहुलमधील इमारती डी. बी. रिअ‍ॅलिटी या विकासकाने बांधल्या होत्या.