पुणे । महाराष्ट्रात कोयना प्रकल्पापासूनचे पूनर्वसन रखडलेले असून त्या विस्थापीतांचे पुनर्वसन करणे हे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समिती पुढील सर्वात मोठे आव्हान असणार असल्याचे मत समितीचे नवनिर्वाचीत उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले. पुणे येथील विदिशा विचार मंचतर्फे भूमिका या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची प्रकट मुलाखत आणि महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार प्रदिप रावत यांच्या हस्ते माधव भांडारी यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी भांडारी बोलत होते.
ही शासकीय यंत्रणेची उदासिनता
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील ज्येष्ठ सनदी लेखापाल सर्वेश जोशी, सनदी लेखापाल सुरेश रानडे आणि मनोहर कोलते उपस्थित होते. यावेळी माधव भांडारी यांच्याशी विदिशा विचार मंचाच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी संवाद साधला. भांडारी म्हणाले, चार-चार पिढ्या जेथे गाव वसलेले असते त्यांना एका रात्रीतून बेघर करुन त्यांचे पूनर्वसनही रखडवायाचे ही शासकीय यंत्रणेची मोठी उदासिनता आहे. आज कोयना, विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प, सातार्या जवळील चांदोली अभयअरण्य अशी एक ना दोन अनेक उदाहरणे देता येतील की ज्या प्रकल्पांमुळे गावची गावे विस्थापीत झाली. प्रकल्पांमुळे विस्थापीत होणार्यांच्या संख्येचा आढावा घेतला तर तो सुमारे 55 लाखाच्या घरात जातो. आज 68 वर्षे होत आली परंतु विस्थापीतांचे पुनर्वसन रेगांळले आहे.
प्रश्नांना दिलखुलास उत्तर
विदिशा विचार मंचाच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी भांडारी यांच्या आयुष्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकणातील बालपण, महाविद्यालयीन दिवस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आता सध्या असलेल्या जबाबदारीबाबत भांडारी यांची भुमिका प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतली. भांडारी यांनी देखील विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली. प्रसिद्ध सूत्रसंचालक योगेश रांगणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
संघर्षासाठी संघर्ष अशी भूमिका नको
पुनर्वसनात होणार्या अशा दिरगांईमुळेच सरकारच्या विकास प्रकल्पांना विरोध होतो. नाणार प्रकल्पाला होणारा विरोध हा त्याही कारणामुळे असू शकतो. नाणारच्या बाबतीत मात्र नव्या सुधारीत कायद्यान्वये जमीन संपादन होणार असल्याने त्याचे थेट फायदे जमीन मालकांना मिळतील यात शंका नाही. अलिकडे प्रकल्पग्रस्तांची तोंडदेखली बाजू घेऊन संघर्षासाठी संघर्ष अशी भूमिका घेतली जाते. कारण संघर्षाचे मुळ कारणच संपले कर कार्यकर्त्यांनी करायचे काय असा प्रश्न यांच्यासमोर पडतो. परंतु, समितीचा उपाध्यक्ष या नात्याने आणि पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ता या नात्याने मी माझ्या अनुभवावर आधारीत सांगू शकतो की प्रश्न किचकट करण्यापेक्षा तो सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक मानसिकाता ठेवली तर अनेक प्रश्न उद्भवण्याच्या आधीच संपू शकतील. वारकरी संप्रदयाच्या दिर्घ आणि समृद्ध वारशाबाबत देखील अभिमानाने उल्लेख करत वारकरी, विठ्ठल भक्ती याविषयी मनात अपार श्रद्धा आणि आदरभाव असल्याचे भांडारी यांनी सांगितले.