मुंबई । माहुल प्रकल्पबाधित वसाहतींमधील दररोज 10.3 दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी (मलजल) प्रक्रिया केंद्र सध्या बंद असून, हे केंद्र चालवणारी ’एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनी’ असफल ठरली आहे. सध्या हे केंद्र सुरू नसल्याने ते पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, त्यासाठी महापालिका तीन कोटी 28 लाख 67 हजार रुपये खर्च करणार आहे. येत्या पाच वर्षांसाठी या केंद्राची देखभाल करण्यासाठी दोन निविदादारांमधून ’नाईक एन्व्हॉर्नमेंटल इंजिनीअर्स प्रा. लि.’ या कंपनीची निवड केली आहे. त्याला संमती मागणारा प्रस्ताव होणार्या स्थायी समितीमध्ये चर्चेला येणार आहे. तानसा जलवाहिनी बाधित तसेच ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांमुळे सदनिकांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
’एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन’वर कोणतीही कारवाई करण्याचे टाळले
एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनीने माहुल येथील प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्ये ’एसआरए’अंतर्गत एका शालेय व 17 इमारतींचे बांधकाम केले आहे. या इमारतींमध्ये 17 हजार 495 सदनिका, 172 बालवाड्या व तितकीच समाज केंद्र आणि दोन समुदाय केंद्र बांधण्यात येणार होती. परंतु, ’एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनी’ने मलजल प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास नकार दिला आहे.
काही वर्षांत सुमारे सहा ते सात हजार प्रकल्पग्रस्त
मालमत्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी व पालिकेच्या ’एम पश्चिम’ विभागाकडे असलेल्या दस्तऐवजनुसार एकूण 17 हजार 495 सदनिकांपैकी एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनीने सन 2012 मध्ये 10160 सदनिका मुंबई पालिकेच्या मालमत्ता विभागाला प्रकल्पग्रस्तांसाठी बांधून सुपूर्द केल्या आहेत. त्यापैकी 9520 सदनिका प्रत्यक्षात विभाग कार्यालये, तानसा पाइपलाइन तसेच ब्रिमस्टोवॅड प्रकल्पग्रस्त व मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवासस्थानासाठी दिल्या आहेत. येत्या काही वर्षांत सुमारे सहा ते सात हजार प्रकल्पग्रस्त या प्रकल्पात पुनर्वसित करण्यात येतील, असा अंदाज आहे.