यावल आंदोलन प्रकरण ; वसतिगृहातील समस्यांचा होणार निपटारा
यावल : प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी रात्री ठिय्या मारत आंदोलन करणार्या जळगाव वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शनिवारी प्रकल्प कार्यालयाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले व जळगावात परतण्याचा निर्णय घेतला. वसतीगृहातील समस्यांचा निपटारा केला जाईल व जे शासनाधीन निर्णय आहेत त्यात कार्यालयस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी दिले. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पाळधी, ता.जळगाव मुलांसाठी नव्यानेच वसतीगृह उभारण्यात आले आहे.
येथील तब्बल 95 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी सात वाजेला यावल कार्यालय गाठले व समस्यांचा पाढा वाचला. त्यात नव्या वसतीगृहात कायम सफाई कामगार, शासनाकडून मिळणारा निर्वाह भत्ता, पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेचा रखडलेला निधी व डीबीटी व्दारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अशा मागण्या होत्या तसेच नव्याने दिला गेलेल्या भोजन ठेक्यासंदर्भात तक्रार होती तेव्हा प्रकल्प कार्यालयाकडून त्यांच्या रास्त मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले तर ज्या शासनाधीन योजना प्रलंबित आहेत तसेच कायम सफाई कामगार व गृहपाल यांच्या संदर्भात वरीष्ठ स्तरावर निर्णय होतील त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांचे समाधान झाल्याने ते माघारी पाळधी परतले.