पुणे। अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यंदा अमरावती येथील पॉप्युलर बुक सेंटरचे नंदकिशोर बजाज यांना रविवारी (दि.20) सकाळी 11.30 वाजता होणार्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बर्वे म्हणाले, संस्थेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. तसेच उत्कृष्ठ ग्रंथ निर्मिती पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत. टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे होणार्या या कार्यक्रमानिमित्त प्रकाशकांचा मेळावाही होणार आहे.