प्रकाशा येथील युवकाचे अपहरण

0

शहादा । पैशांच्या व्यवहारातून प्रकाशा (ता.शहादा) येथील एका युवकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या युवकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गावातीलच एका व्यक्तीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्‍वर हरलाल सावळे (वय 16, रा.प्रकाशा) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत ज्ञानेश्‍वरची आई मनिषा अनिल साळुंखे (वय 30) यांनी फिर्याद दाखल केली असून संशयित आरोपी बोरद्या उर्फ प्रकाश लिमजी पाटील (रा.प्रकाशा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संशयाची सुई प्रकाशकडेच
या प्रकरणात संशयाची सुई प्रकाश पाटील याच्याकडे वळत आहे. पैशांच्या व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा आरोप मनिषा साळुंखे यांनी केला आहे. 5 मे रोजी प्रकाश याने ज्ञानेश्‍वरला पळवून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अपहरण होण्यापूर्वी ज्ञानेश्‍वर प्रकाशच्या दुचाकीवरून जात असल्याचे एकाने पाहिले आहे. मात्र, आपण ज्ञानेश्‍वरला देवमोगरा माता मंदिराजवळ सोडले. तेथून तो कोठे गेला, याबाबत आपल्याला माहिती नसल्याने प्रकाश सांगत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.