प्रकाशा येथून गौण खनिजांची वाहतूक

0

नंदुरबार । प्रकाशा येथील तापी नदी पात्रातील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चोरी होत असल्याने या ऐतिहासिक नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महसूल विभागाने देखील याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळं गौण खनिज चोरी करणार्‍यांचे चांगलेच फावत आहे. दक्षिण काशी म्हणून प्रकाशा या धार्मिक स्थळाची ओळख आहे. या ठिकाणी तापी, गोमाई, सुर्यकण्या, अश्या त्रिवेणी नद्यांचा संगम आहे. मात्र या तापी नदी पात्रातून दगड आणि वाळू चा बेकायदेशीर उपसा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात
शासनाने कोणत्याही प्रकारे दगड व वाळू उपशाला परवानगी दिलेली नसतांना केवळ स्थानिक महसूल अधिका़र्‍यांच्या मूक संमतीने हा प्रकार सुरू आहे. जवळच मोठा पूल असतानाही बेकायदेशीर गौण खनिजची खुलेआम वाहतूक होत असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. कुठलाही कर न भरता वाळू व दगडांची चोरी होत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे तापी नदी पात्रात मोठे खड्डे पडले असून नदी पात्राचे असतित्व धोक्यात आले आहे. ते वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन हा प्रकार थांबविण्याची मागणी होऊ लागली आहे.