प्रकाशा येथे होतोयं मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा!

0

नंदूरबार । दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा येथे मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा करून ठेवण्यात आला असून नेमका हा वाळूसाठा अधिकृत आहे की अनधिकृत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. महसूल प्रशासनही याबाबत योग्य तो खुलासा करीत नसल्यामुळे या वाळूसाठ्याबद्दल संशयाची पाल चुकचुकायला लागली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तापीच्या वाळूला भरपूर मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीची वाळू बहुचर्चीत आहे.मुंबई – पुणे सारख्या शहरात येथील वाळूला मागणी असल्याने स्थानिक लोकांना बरोबर घेवून बाहेरचे ठेकेदार वाळू घाटचा लिलाव घेत असतात. शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडवून वाळू उत्खननमध्ये मोठ्या प्रमाणावर गफला केला जात असल्याचा प्रकार देखील अनेकदा उघडकीस आला असून याबाबत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेही नोंदिवण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीत शहादा तालुक्यात दोनच ठिकाणी वाळू उत्खनन केले जात आहे. त्यामुळे वाळूला मागणी होणे साहजिकत आहे. प्रकाशा येथील संत आसाराम महाराज यांच्या आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा करून ठेवण्यात आला असून याबाबत नागरिकांच्या मनात तर्कवितर्क लावले जात आहे. प्रकाशा येथील मंडळाधिकारी बी.ओ.पाटील यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रकाशा येथे वाळूसाठा करण्यासाठी संबंधीत ठेकेदारांनी परवानगी अर्ज माझ्याकडे पाठविला होता. तो प्रस्ताव तहसिलदारांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे वाळू साठा करण्याकरीता परवानगी देण्यात आली किंवा नाही याबाबत मी सांगू शकत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. शहाद्याचे तहसीलदार नितीन गवळी यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे या वाळूसाठा प्रकरणी अधिक माहिती मिळू शकली नाही. हा वाळू साठा कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर याचा खुलासा महसूल विभागाने करणे गरजेचे आहे.