प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका भाजपला मदत करणारी!

0
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे 
मुंबई : भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या युतीची घोषणा झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका अपत्यक्षरीत्या भाजपला मदत करणारी असल्याचे दिसत असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रणित महाआघाडीच्या चर्चेसाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर कवाडे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल  विचारले असता ते म्हणाले की, ते नेहमीच असे करतात.सध्या एम आय एम बरोबर त्यांच्या पक्षाच्या युतीचा विचार सुरू आहे. याबाबत आंबेडकर यांनी पुनर्विचार करावा. त्यांनी महाआघाडीत येऊन बहुजनांचे नेतृत्व करावे.जर आंबेडकर हे महाघाडीत येत नसतील आणि त्यांच्या कृत्यामूळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार असेल,  तर जनतेच्या मनात हाच संदेश जाणार की प्रकाश आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करणारे आहेत , असेही कवाडे यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाआघाडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.  या संदर्भात तिसरी बैठक विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला जोगेंद्र कवाडे यांच्यासह भाकपचे तुकाराम भस्मे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी उपस्तिथ होते.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत. त्यांनी आपली राजकीय भूमिका घेण्याची घाई करू नये,  असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. राज्यात महाआघाडी बाबत सर्वच समविचारी पक्षांशी चर्चा सुरू आहे.या चर्चेचा तपशील पक्षाच्या हायकमांडकडे लवकरच पाठवला जाणार असून राज्यात समविचारी महाआघाडी उदयाला येईल अशा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.