प्रकाश आंबेडकरांचे आरोप निषेधार्ह

0

पुणे । पुरोगामी विचारांनी राजकारण करणार्‍या शरद पवारांवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आरोप निषेधार्ह आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता एकबोटे यांनी व्यक्त केली.

भीमा कोरेगाव दंगलीशी संबंधित आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना पोलीस खाते मोक्का लावणार होते, परंतु पवार यांच्या हस्तक्षेपामुळे एकबोटे त्यातून सुटले, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. या कारणाकरिता त्यांच्याशी राजकीय आघाडी करणार नाही, अशी भूमिका आंबेडकर यांनी घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, महिलांसाठी आरक्षण, महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा असे पुरोगामी निर्णय घेणार्‍या पवारांवर केलेले आरोप पुरोगामी जनता कधीच मान्य करणार नाही, असे एकबोटे म्हणाले.बहुजन समाजाचे आदराचे स्थान असणार्या पवारांवर आंबेडकर यांनी बेछूट आरोप करू नयेत, प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय युती कोणाशी करावी हा त्यांचा प्रश्‍न आहे.परंतु त्यांनी थोडासा इतिहास आठवावा म्हणजे त्यांचे राजकीय संतुलन व्यवस्थित राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रविंद्र माळवदकर यांनी दिली. नावात आंबेडकर असून चालत नाही, जगण्यात आणि विचारात महामानव डॉ. आंबेडकर असावे लागतात, असे माळवदकर यांनी पत्रकात म्हटले आहे.