संभाजी भिडे यांचा आरोप : आंबेडकरांच्या चौकशीची मागणी
सांगली : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा देताच, भिडे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी आंबेडकर यांचीच चौकशी करण्याची मागणी केली. आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन असून, त्यांच्या विधानामुळेच महाराष्ट्र पेटला, असा दावाही त्यांनी केला. तसेच, राज्यात उसळलेल्या दंगलीत 97 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई प्रकाश आंबेडकर व एल्गार परिषदेकडून वसूल करावी, अशी मागणीही भिडे यांनी करत, 28 मार्चरोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. दंगलीत राज्यात जे नुकसान झाले ते आम्ही पदरात घेतो, आम्ही नुकसान भरतो, असे शासन म्हणते आहे. असे का? कशासाठी, कुणासाठी, राज्य शासनाला हा अधिकार कुणी दिला? असे सवालदेखील भिडे यांनी केले.
राजकीय पक्ष स्वार्थासाठी चूप बसले!
श्री शिवप्रतिष्ठाणच्यावतीने सोमवारी संभाजी भिडे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या प्राणघातक हल्ला व हिंसाचारातील प्रमुख आरोपी असलेल्या भिडे यांनी आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, गेल्या चार ते पाच वर्षात आपण पुण्याजवळच्या वढू गावाकडे फिरकलोदेखील नाही. प्रकाश आंबेडकर हे विद्वेषाचे राजकारण करत असून, आपण सत्याची बाजू लावून धरत आहोत, असे त्यांना वाटते. भीमा कोरेगाव हिंसाचारावेळी त्यांनी जी विधाने केली त्यामुळेच महाराष्ट्र पेटला. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, आणि या हिंसाचाराची त्यांना चुकीची माहिती देणार्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भिडे यांनी केली. या दंगलीनंतर मिलिंद एकबोट आणि मला अटक करण्याची मागणी काही जण करत आहेत. हा म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. मुळात या सगळ्या दंगलीची सूत्रधार ही एल्गार परिषद आहे. एल्गार परिषदेचे शनिवारवाड्यासमोर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उमर खालिदला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा हेतू मुळात भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवणे हाच होता. त्यामुळे सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी भिडे यांनी केली. सध्या माझ्यावर आरोप होत असताना सर्वच राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी गप्प बसले आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे दलितांना खूश ठेवता यावे, त्यांची मते मिळावीत, यासाठी राजकीय पक्षांकडून भीमा कोरेगाव प्रकरणाचा वापर सुरू आहे, असे म्हणत राजकीय पक्षांनाही भिडे यांनी लक्ष्य केले.
मला अटक करून काय साध्य होणार?
प्रकाश आंबेडकर यांनीदेखील माझ्यावर तारतम्य सोडून आरोप केले. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देऊन त्याला पढवून बोलायला लावले जाते, तसे प्रकाश आंबेडकरांचे वर्तन आहे. मी गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये कोरेगाव भीमा परिसरात फिरकलेलो नाही. त्यामुळे मला अटक करून काय साध्य होणार? परंतु, प्रकाश आंबेडकरांना माझ्या अटकेची मागणी करून आपण सत्याचा पुरस्कार करतोय, असे वाटत आहे. सर्वप्रथम आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा दंगलीच्यावेळी त्याठिकाणी होतो, ही माहिती कोणी दिली, त्यांची नावे उघड करावीत. सरकारनेही त्यांची चौकशी करावी, असे संभाजी भिडे म्हणाले.
पुण्यात एकबोटेंना काळे फासण्याचा प्रयत्न
भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांची पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने सोमवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. युक्तिवाद ऐकल्यानंतर एकबोटे यांना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एकबोटे यांना मधुमेह असल्याने वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानंतर न्यायालयातून बाहेर पडताना न्यायालयाच्या आवारातच अज्ञातांनी एकबोटे यांना काळे फासण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या दंगलप्रकरणी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी भीमा कोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच गणेशबापू फडतरे, योगेश नरहरी गव्हाणे या कार्यकर्त्यांनीच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या सांगण्यावरून दंगल घडवल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
1 जानेवारीच्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. तरीही माझं नाव या प्रकरणाशी जोडण्यात आलं. भूत म्हणून जमीन बडविण्याचा हा प्रकार आहे. आपल्याबद्दल चुकीची माहिती पसरविली जात असल्याने त्याच्या निषेधार्थ येत्या 28 मार्चरोजी राज्यव्यापी मोर्चा काढणार आहोत.
– संभाजी भिडे, अध्यक्ष शिवप्रतिष्ठाण