प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून ‘भीक मागो’ आंदोलन

0

पुणे : काही शाळा सरकारकडे आर्थिक मदत मागण्यासाठी भीकेचा कटोरा घेऊन येतात. मात्र ते माजी विद्यार्थ्यांकडे सहज आर्थिक मदत मागू शकतात. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणे हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे वक्तव्य जनप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने या वक्तव्याचा निषेध करण्यात येऊन भीक मागो आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांने आंदोलन केले. हातात वाडगा घेतले आणि सिग्नलवर भीक मागण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृतीमुळे पोलिसांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना काय सुरू आहे हेच समजेना. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात आंदोलन केल्याचे स्पष्ट केले. जमा झालेले पैसे जावडेकर यांना पाठवणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, शिक्षणमंत्री असूनही जावडेकर यांचे हे विधान अतिशय भयंकर आहे. या विधानाबाबत त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. यावेळी “जा – वडे- कर” अशी घोषणा देण्यात आली. या आंदोलनात प्रवक्ता अंकुश काकडे, महिला शहाराध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर, मनाली भिलारे, अमोघ ढमाले आदी उपस्थित होते.