नवी दिल्ली । केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांना शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेनका गांधी आज पीलीभीत येथे आरोग्य योजना आणि लसीकरण कार्यक्रमाच्या पाहणीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे मेनका गांधी यांना तातडीने स्थानिक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी मेनका गांधी यांना श्वास घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. पित्ताशयात असलेल्या मुतखड्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुढील उपचारांसाठी मेनका गांधी यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात येणार असल्याचे समजते.