पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आले होते. मात्र संमेलनाच्या आयोजकांनी ते निमंत्रण रद्द केले असून सुरक्षेचे कारण देत निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा ईमेल सहगल यांना पाठवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे सहगल यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली असून,आयोजकांच्या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.
नयनतारा सहगल यांची देशात होत असलेल्या साहित्यिक, विचारवंत यांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर आलेली गदा, मॉब लिंचीग याबाबत मते परखड आहेत. या सर्व मुद्द्यांचा नयनतारा सहगल यांच्या भाषणात उल्लेख होणार होता. त्यांच्या या भूमिकेचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल, या भीतीतून सहगल यांना काही राजकीय दबावामुळे संमेलनाला न येण्याचे पत्र यवतमाळ आयोजकांकडून सहगल यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान याबाबत सहगल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तरीही, त्या आयोजकांकडे भाषणाची प्रत पाठवण्यावर ठाम आहेत.