नवी दिल्ली । नोटाबंदीमुळे पुढील काळात तीव्र अर्थिक चढउतार पाहायला मिळतील. त्यामुळे प्रगतीचा आलेख काही काळासाठी खालावेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. नोटाबंदीच्या निर्णयाला शंभर दिवस झाले. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. सध्या चलनीकरणाची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. तसेच नोटाबंदीनंतर विविध स्तरांवर निर्माण झालेली परिस्थिती सामान्य पातळीवर आणण्यात रिझर्व्ह बँकेने यश मिळवले आहे.
निर्बंध उठवले जात आहेत
सध्या बँक खात्यामधून दिवसाला 24 हजार इतकी रक्कम काढता येऊ शकते. येत्या 20 फेब्रुवारीपासून ही मर्यादा काहीप्रमाणात वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 20 फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून 50,000 रुपये काढता येतील. 20 फेब्रुवारी ते 13 मार्च या काळात ही मर्यादा कायम राहिल. त्यानंतर 13 मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या द्वैमासिक पतधोरणात यंदाच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर 6.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या पतधोरणात रेपो दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. येत्या 13 मार्चपासून बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध उठविण्याची घोषणाही करण्यात आली होती. त्यामुळे बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत.
आव्हानांना तोंड देण्यात यश
नोटाबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच पूर्ण क्षमतेने नोटांची छपाई करण्याचे नियोजन केले होते, असे पटेल यांनी सांगितले. आरबीआयने मागील काही महिन्यात मोठ्या आव्हानांना तोंड दिले आहे. नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकनेच नव्हे, तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेनेचे खूप मोठी काम केले आहे. आव्हानांच्या व्याप्तीचा विचार करता लोक कुठपर्यंत त्यावर मात करतात, हे ध्यानात घेणेदेखील गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
परिस्थिती सामान्य पातळीवर
नोटाबंदीनंतर अनेक स्तरावर निर्माण झालेली परिस्थिती सामान्य पातळीवर आणण्यात रिझर्व्ह बँकेने यश मिळवले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच पूर्ण क्षमतेने नोटांची छपाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. –उर्जित पटेल