प्रगत राष्ट्राकरीता शिक्षणासोबत कला, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य गरजेचे – अ‍ॅड. चव्हाण

0

सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पुणे : आपल्या स्वप्नातील चित्र कॅनव्हासवर रंगविण्यात प्रत्येकालाच विलक्षण आनंद वाटतो. आजची पिढी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे. जगामध्ये प्रगत देश म्हणून भारताला ओळख मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणासोबतच कला, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य देखील गरजेचे आहे. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या माध्यमातून सातत्याने 14 वर्षे सशक्त भारत, सशक्त समाजाकरीता विविध समाजोपयोगी राबविले जाणारे उपक्रम हे देखील प्रगत राष्ट्राच्या दृष्टीने पुढचे पाऊल आहे, असे प्रतिपादन खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केले.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, सि. धों. आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

चित्रकलेतून सामाजिक जाणीवेचे संस्कार

अनेक देशांमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले गाव, शहर, देश स्वच्छ ठेवण्याकरीता पुढे यायला हवे. स्वच्छतेची भावना मनात रुजली तरच हे काम शक्य आहे. चित्रांच्या माध्यमातून आपण लहानपणापासून स्वच्छतेचे महत्त्व रेखाटत असतो. मात्र, ते पुढे प्रत्यक्षात देखील आणायला हवे, असे अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले. सामाजिक विषय मुलांना देऊन चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचे संस्कार घडविण्याचे काम कलेच्या माध्यमातून केले जात आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, माजी, डॉ. विकास आबनावे, पी. डी. आबनावे, प्रकाश आबनावे, राजेश आबनावे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

8 डिसेंबरला चित्रांचे प्रदर्शन

राज्यातील 143 कला महाविद्यालये आणि पुण्यातील 105 शाळांतील सुमारे 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली. सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालक व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सहकारनगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी उपमहापौर आबा बागुल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वोत्तम चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.