भुसावळातील प्रा.जगदीश पाटील यांचा न्हावी विद्यालयात गौरव
न्हावी, ता. यावल- ज्ञान आणि माहिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्यासाठी अनुभव देण्याचा विचार करण्याची एक महत्त्वपूर्ण पायरी असते, हे ध्यानात घेऊन आपले काम करणारा शिक्षकच उत्कृष्ट शिक्षक म्हणता येईल. या सर्वांचा समन्वय साधून अभ्यासक्रम व मूल्यमापनात आपली चोख कामगिरी बजाविणार्या डॉ.जगदीश पाटील यांच्यासारखी प्रगल्भ शिक्षक निर्मिती ही आजच्या काळातील शिक्षण क्षेत्राची गरज असल्याचे प्रतिपादन तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा मसाका चेअरमन शरद महाजन यांनी येथे केले. भुसावळ येथील द. शि. विद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून बालभारती पुणे येथे आठवी व दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तक निर्मितीत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून न्हावी येथील शारदा माध्यमिक विद्यालयात आयोजित समारंभात महाजन बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे खजिनदार डॉ.दीपक पाटील होते. व्यासपीठावर सरपंच भारती चौधरी, भारत विद्यालयाचे चेअरमन मिलिंद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे, ललितकुमार फिरके यांची उपस्थिती होती. डॉ. दीपक पाटील म्हणाले की, जे घेण्याजोगे आहे, ते समजून घेणे आणि समजलेले शिकून घेऊन ते प्रत्यक्ष कृतीत कसे आणता येईल याचे विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे हे चांगल्या शिक्षकाचे काम आहे. डॉ.पाटील यांनीदेखील अशा प्रकारचे काम केल्याने जळगाव जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे यांनी डॉ.पाटील यांचा परीचय करून दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पहिलाच सत्कार जीवनातील संस्मरणीय -प्रा.जगदीश पाटील
सत्कारास उत्तर देताना पाटील म्हणाले की, 2012 मध्ये पीएच.डी. पदवी मिळाल्यानंतर पहिला सत्कार ज्या शाळेत झाला, त्याच शाळेत बालभारतीतील कार्याचा गौरव म्हणून झालेला हा पहिलाच सत्कार माझ्या जीवनातील संस्मरणीय ठेवा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रवीण वारके यांनी तर आभार एन.आर. चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाय.एन.तळेले, सुनील भोळे, किशोर बर्हाटे व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.