प्रचाराच्या शेवटच्या दिवशीचा ड्राय डे रद्द!

0

मुंबई : महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवस ‘ड्राय डे‘ जाहीर करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यापैकी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशीचा म्हणजे 19 फेब्रुवारीचा ड्राय डे रद्द केला आहे. तर 20 आणि 21 फेब्रुवारी रोजीची दारूबंदी कायम ठेवली असून, निकालाच्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच ड्राय डे असेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक काळातील दारूबंदी जाचक असल्याचा आक्षेप

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाने अधिसूचना जारी करून 19, 20, 21 आणि 23 फेब्रुवारी रोजी ड्राय डे जाहीर केला होता. या काळात मद्यविक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र निवडणूक काळातील ड्राय डे जाचक असल्याचे सांगत, ठाण्यातील हॉटेल मालक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

निकालाच्या दिवशी पाच वाजेनंतर मिळणार दारू!

दारुबंदीचा नियम केवळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला लागू आहे, असा दावा याचिकार्त्यांनी केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने 19 फेब्रुवारीचा ड्राय डे रद्द केला. 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम राहणार आहे. तर 23 तारखेला संपूर्ण दिवसाचा ड्राय डे उठवत, 5 वाजेपर्यंत म्हणजेच निकाल लागेपर्यंत लागू केला आहे. ड्राय डेच्या काळात प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून, अबकारी विभागाचा हा निर्णय बेकायदा, मनमानी आहे. तसेच तो व्यवसाय करण्याच्या घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला होता.