नवी दिल्ली । राज्यभरात मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकांचा रोमांच आता शिगेला पोहोचला आहे. आचारसंहितेमुळे प्रचार तोफा थंडावल्या असून आता गुरुवारी 16 फेबुवारी रोजी मतदानाची चुरस पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वच ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकांच्या निमित्ताने पणाला लागली असून आता प्रत्येक नेता विजयी होणार असल्याचा दावा करत आहेत.
जि.प साठी 256 तर पं.स साठी 520 उमेदवार
रात्री बारा वाजेपासून निवडणूक प्रचार बंद होणार आहे. आता केवळ छुपा प्रचार होणार असून या दरम्यान ’लक्ष्मी’ दर्शनासारख्या घटनांवर आळा घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यातील 67 जिल्हा परिषद गटासाठी 256 उमेदवार तर 134 पंचायत समिती गणासाठी 520 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. दरम्यान प्रशासनाची निवडणुकीसंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रचार मध्यरात्रीपासुन बंद होणार असुन निवडणुकीदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडु नये यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्हाभरात 15 तालुक्यात एकूण दोन हजार 457 मतदान केंद्रे आहेत. मंगळवारी रात्री 12 वाजेपासून प्रचार बंदीनंतर कोठेही राजकीय पक्षाचा प्रचार होतांना आढळल्यास उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मिडीयावर देखील प्रशासनाची करडी नजर असणार आहे.