असोदा रेल्वे गेटजवळील कला वसंत नगरात दोन घर तर शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये एक घर फोडले ; पेट्रोलचीही केली चोरी
जळगाव – शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सलग दुसर्या दिवशी चार घरे फोडून हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. असोदा रेल्वे गेटजवळील कला वसंत नगरात दोन घर, एक दुकान तर शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये एक घर फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा जळगावातील प्रजापतनगरात चोरट्यांनी तीन घरे फोडल्याचा प्रकार ताजा असतानाच सलग दुसर्या दिवशी पुन्हा चोरट्यांनी चार ठिकाणी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे दोन घरांमध्ये कुटूंबीय झोपलेले असताना चोरी झाली आहे.
खिडकीतून हात टाकून उघडली दरवाज्याची कडी
असोदा रेल्वे गेटजवळ असलेल्या कला वसंत नगरात महादेव विठ्ठल भोळे, वय-65 हे कुटुंबासह राहतात. रात्री ते परिवारासह घरात झोपलेले असताना पहाटे 3.30 च्या सुमारास चोरट्यांनी खिडकीच्या बाहेर खाट आडवी टाकली. खाटेवर चढून चोरट्यांनी खिडकीतून काहीतरी वस्तूच्या सहाय्याने घराच्या दरवाज्याची कडी आतून उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटाला लावलेली दीड हजार रुपये असलेली पर्स चोरून नेली. पहाटे 4 वाजता घरातील एका व्यक्तीला बाहेरगावी जायचे असल्याने ते उठले असता दरवाजा उघडा दिसल्याने घडलेला प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी पर्स घराच्या मागील बाजूला फेकून पळ काढला. घरातील कुटूंबियांनी शोधाशोध केल्यानंतर मागील बाजूला पर्स मिळून आली. घराच्या बाहेर असलेला लाईट देखील चोरट्यांनी काढून घेतला तर त्यांचा मुलगा लोकेश भोळे याच्या एमएच.19.डिजी.8622 या दुचाकीच्या नळ्या, वायर कापून फेकल्या व पेट्रोल चोरले.
घराला कडी लावत किराणा दुकान फोडले
कला वसंत नगरातच मूलचंद देविदास साळुंखे यांचे किराणा दुकान आहे. ते कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराला बाहेरून कडी लावली. घराच्या बाहेरच असलेल्या किराणा दुकानाचे कुलूप तोडत दुकानात प्रवेश केला, दुकानातील सामान अस्तावस्त करून गल्ल्यातील दीड हजार रुपये रोख लंपास करीत त्यांनी पळ काढला. चोरट्यांनी कुलूप बाहेर हवेत भिरकावल्याने ते समोरच असलेल्या केबलच्या वायरवर अडकलेले होते. सकाळी 6 वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी किराणा सामान खरेदीसाठी आले असता प्रकार लक्षात आला.
कुटुंबीय वरच्या मजल्यावर, खाली चोरट्यांचा डल्ला
साळुंखे यांच्या घरामागेच शरद त्रंबक अहिरे हे परिवारासह राहतात. अहिरे हे घराच्या वरील मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी खालील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. किचनमध्ये ठेवलेली दीडशे रुपयांची रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला.
अमनपार्कमध्ये बंद घरातून 12 हजाराची रोकड लांबविली
शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये प्लॉट क्रमांक 32 मध्ये मोहम्मद अली इस्माईल अली सैय्यद हे परिवारासह राहतात. ते बॉश चेसीस कंपनीत कामाला आहेत. मोहम्मद अली हे परिवारासह नातेवाईकांना भेटण्यासाठी मंगळवारी धुळे येथे गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या कंपाउंडच्या गेटवरून उडी मारली. मुख्य दरवाज्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडत 12 हजार रुपये रोख रक्कम लंपास केले.
मुलाच्या शिक्षणाची रक्कम चोरी
मोहम्मद अली यांचा मुलगा सोहेल हा त्रिमुर्ती कॉलेजमध्ये डिप्लोमा मॅकेनिकलच्या दुसर्या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने नुकताच प्रवेश घेतला असून चालू वर्षाची शैक्षणिक फी भरण्यासाठी 12 हजार रूपये त्याच्या आईने कपाटात ठेवले होते. चोरट्यांनी तीच रक्कम चोरून नेली आहे. मोहम्मद अली यांच्या घरातील लोखंडी कपाटात एका बाजूला एक गुप्त कप्पा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये मौल्यवान दागिने आणि रोकड ठेवण्यात आली होती. परंतु चोरट्यांना तो कप्पा लक्षात न आल्याने रोकड आणि दागिने सुरक्षित राहिले आहे.
चोरट्यांना पळताना नागरिकांनी पाहिले
कलावसंत नगर नव्याने वाढत असलेला परिसर आहे. या परिसराच्या बाजूलाच रेल्वे रूळ असून त्या पलीकडे जुने जळगावचा आणि कांचननगरचा परिसर आहे. पहाटे चोरट्यांनी डल्ला मारल्यानंतर नागरिकांना जाग आली. यावेळी चोरट्यांचा शोध सुरू असताना तीन जण रेल्वे रूळ ओलांडत पळताना नागरिकांना दिसून आले. असोदा रेल्वे गेटवर राहणार्या गेटमनने देखील त्यांना पाहिले आहे.