राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे पाईक म्हणजे संघाचे ‘स्वयंसेवक’. अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे संघाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप कार्यक्रम मानला जातो. त्याला संबोधित करण्यासाठी प्रणवदांची हजेरी म्हणजे सर्वांचे कान उभे राहणारी गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही विचारप्रणालीचे कार्यकर्ता संमेलन अथवा प्रशिक्षण शिबिराला समविचारी संघटनांच्या म्होरक्यांना अथवा बुद्धिजीवींना बोलावले जाते. मात्र, एकदम विरुद्ध विचारसरणीच्या बुद्धिजीवींना बोलावून आपल्या संघसेवकांना कोणता विचार संघचालक करणार आहेत, हे न उमगणारे कोडे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण शिबिर आणि त्याच्या समारोपाला प्रणवदांची हजेरी हा खूपच चर्चेचा विषय झाला आहे. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये 708 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्यांना प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. माजी राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारणे म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्याचा देशाला दिलेला संदेश आहे आणि मतविरोधी असणे म्हणजे शत्रू असणे असे नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या जाणार्या प्रश्नांना हे निमंत्रण स्वीकारणे हे उत्तर आहे, असे मत संघाच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. गेली अनेक दशकं काँग्रेसचे नेते असलेले मुखर्जी गेल्या जुलैमध्ये राष्ट्रपती पदावरून पायउतार झाले. इंदिरा गांधीपासून ते राजीव गांधींपर्यंत व नंतर सोनिया गांधींसोबत मुखर्जी यांनी काम केले आहे. मनमोहन सिंग सरकारमध्ये मुखर्जी यांनी अर्थमंत्रीपदही सांभाळले होते. त्यामुळे काँग्रेसचा प्रदीर्घ वारसा असलेले व राष्ट्रपतीपदासारखे सर्वोच्चपद भूषवलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, याबाबत सगळ्यांना औत्स्युक्य आहे. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघस्थानी येणार असल्याच्या या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, संघ स्वयंसेवकांमध्येदेखील या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे. तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नागपुरात 14 मेपासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 708 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.
याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारदेखील केला आहे. संघाच्या प्रणालीत तृतीय वर्ष वर्गाचे महत्त्वाचे स्थान असते. दरवर्षी रेशीमबागला होणार्या समारोप कार्यक्रमाला देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती असते. मागील वर्षी नेपाळचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल रुक्मांगुद कटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याअगोदर कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ. वीरेंद्र हेगडे, सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे. यावेळी मंचावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचीदेखील उपस्थिती राहणार असून, ते स्वयंसेवकांना उद्बोधन करणार आहेत. प्रणव मुखर्जी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले, तरी त्यांची राजकीय जडणघडण काँग्रेसच्या मुशीतूनच झाली आहे. संघ परिवार आणि भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर प्रहार करण्यात येत आहे. कधी नव्हे ती संघाकडून जाहीरपणे काँग्रेसच्या राजकारणावर टीका करण्यात आली. भाजपच्या नेत्यांकडून तर काँग्रेसमुक्त भारताचे नारेच लावण्यात येत आहेत, अशा स्थितीत प्रणव मुखर्जी यांचे संघस्थानी येणे ही बाब काँग्रेसच्या ‘हायकमांड’ला कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. त्यामुळेच ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द होऊ नये यासाठी संघाने मुखर्जी यांच्या उपस्थितीच्या घोषणेबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. संघाच्या कार्यक्रमांना विरोधी विचारधारेतील व्यक्तींना बोलवण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही संघाच्या बर्याच कार्यक्रमात विरोधकांनी येऊन मंचावरून आपले विचार मांडले असल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत.
भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांची निवड झाली होती. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मुखर्जी यांचे वडील स्वतंत्रसेनानी होते, त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ कारागृहात काढला. 1920 सालापासून त्यांनी काँग्रेसच्या सर्व आंदोलनांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मुखर्जी यांचे वडील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्यदेखील होते तसेच पश्चिम बंगाल विधानपरिषदेचे (1952-1964) या काळात अध्यक्ष होते. केंद्रातील अत्यंत महत्त्वाची मंत्रिपदे प्रणवदांनी सांभाळली आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणे निधी वर्ल्ड बँक, एशियन विकास बँक, आफ्रिकन विकास बँक, ग्रुप 24 आंतरराष्ट्रीय नाणे निधी मंत्रिमंडळाचे अध्यक्षपद (आईएमएफ आणि वल्ड बँकेशी संबंधित), सार्क परिषदेचे अध्यक्षपद, असे आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आपले लिखाण केले आहे. मिडटम पोल – 1969, बीयॉन्ड सरव्हायव्हल – इमरजिंग डायमेनशन ऑफ इंडियन इकोनॉमी – 1984, ऑफ द ट्रॅक – 1987, सागा ऑफ स्ट्रगल अँन्ड सॅकरीफाइज -1992, चॅलेंजेस बीफोर द नेशन (ऑन इंडियन नॅशनल काँग्रेस) – 1992 ही प्रणव मुखर्जी यांची प्रकाशित पुस्तके आहेत. समाजवादी म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी संघटनेत आपली उभी हयात घालवलेले असे हे व्यक्तिमत्त्व आहे. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती आणि संकल्पना त्यांच्या विचार आणि जीवनशैलीच्या अत्यंत विरुद्ध आहे. आरएसएस परिवार हा कट्टर हिंदू धर्मवादी संकल्पना अंगीकारतो. हिंदू राष्ट्रनिर्मितीचे ध्येय घेऊन त्यांचा जन्म झाला. आरएसएसचा इतिहासही रक्तरंजित आहे. धार्मिक आणि जातीय दंगलींमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे, अशा संघटनेचे पाईक म्हणजे संघाचे ‘स्वयंसेवक’. त्या स्वयंसेवक निर्मितीचा कारखाना म्हणजे संघाची प्रशिक्षण शिबिरे असतात. पदवी प्रदान करताना जसा पदवीदान समारंभ असतो तसा हा प्रशिक्षण वर्गाचा समारोप कार्यक्रम मानला जातो. त्याला संबोधित करण्यासाठी प्रणवदांची हजेरी म्हणजे सर्वांचे कान उभे राहणारी गोष्ट आहे. आरएसएस ही एक अशी संघटना आहे की तिचे निर्णय खूप विचारांती घेतले जातात. त्याचे खूप दूरगामी परिणाम ठरलेले असतात. प्रणवदांचे नाव निश्चित करताना संघ परिवारात चर्चेचा मोठा काथ्याकूट झाला असणार हे निश्चितच. मात्र, तरीही सरसंघचालकांनी त्या नावावर शिक्कामोर्तब करणे म्हणजे यामागे नक्की काहीतरी दडले आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही विचारप्रणालीचे कार्यकर्ता संमेलन अथवा प्रशिक्षण शिबिराला समविचारी संघटनांच्या म्होरक्यांना अथवा बुद्धिजीवींना बोलावले जाते. मात्र, एकदम विरुद्ध विचारसरणीच्या बुद्धिजीवींना बोलावून आपल्या संघसेवकांना कोणता विचार संघचालक करणार आहेत हे न उमगणारे कोडे आहे. असो परंतु शत-प्रतिशतचा नारा लगावत जसा भाजप पुढे सरकतोय, तसा संघही वाढतोय हे नक्की.